सावंतवाडी सकल मराठा समाजाच्यावतीने गाव जोडो अभियान

Edited by: विनायक गावस
Published on: January 14, 2024 13:59 PM
views 139  views

सावंतवाडी :  सावंतवाडी सकल मराठा समाजाच्यावतीने गाव जोडो अभियान राबविण्यात येणार असून गावातील प्रत्येक वाडीवर मराठा समाजाची शाखा स्थापन करण्यात येणार आहे. या मराठा समाजाच्या शाखेचे पदाधिकारी हे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असणार नाहीत. तर राजकीय पक्षातील मराठा मंडळी फक्त सल्लागार म्हणून राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी सर्व मराठा संघटनांनी एकत्र येत कोणत्याही राजकीय व्यक्तीस व्यासपीठावर अथवा मराठा समाजाच्या कार्यकारिणीवर न घेता सकल मराठा समाज स्थापन केला होता व पक्षातील मराठा बांधवांना नेते मंडळीला सल्लागार म्हणून घेतले होते. त्याच धर्तीवर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठबळ देण्यासाठी व मराठा समाजाला आपल्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी मराठा जोडो अभियान राबविण्यात येणार आहे. सावंतवाडी तालुक्यातील राजकीय पक्षाशी संबंधित नसलेल्या मराठा बांधवांनी या मराठा जोडो अभियानात सहभागी होऊन गाव,वाडी तिथे शाखा स्थापन करावी असे आवाहन करण्यात आले आहे.