ओटवणेतील आगळीवेगळी परंपरा ; 'नव्या'चा शुभारंभ

Edited by: विनायक गांवस
Published on: September 08, 2024 09:15 AM
views 363  views

सावंतवाडी : ओटवणे येथील आगळ्यावेगळ्या 'नव्या' चा अर्थात सामूहिक भात कापणीचा शुभारंभ गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी पारंपारिक पद्धतीने करण्यात आला. नव्याची पूजा केल्यानंतर कापलेल भात घरी आणून त्याची पूजा केली जाते. गावातील प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर या नव्याच्या तोरणाचा साज सजलेला होता. 

          

श्रावणानंतर शेतात पिकविलेले धान्य पदरी पाडण्यासाठी  नव्याद्वारे ओटवणे गावात निसर्गासह ग्रामदेवतेला गाऱ्हाणे घालण्याची प्रथा आहे. दरवर्षी पूर्व नक्षत्रात गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी नवे साजरे करण्याची प्रथा आहे.  रविवारी सकाळीच कुळघराकडे दवंडी देण्यात आली. त्यानंतर कुळ घराकडे ग्रामस्थ जमा झाल्यानंतर सर्वजण सवाद्य नवे साजरे करण्याच्या ठिकाणी गेले. पुरोहिताच्या मंत्रोच्चारात भात पिकाची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर ढोलांच्या गजरात भातपिकाच्या संवर्धनासाठी, भरघोस पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडू दे असे गाऱ्हाणे घालण्यात आले. 

           

यावेळी भात कापणी करून कापलेले नवे कापडात लपेटून ग्रामस्थ पुन्हा सवाद्य कुळघराकडे निघाले. तदनंतर हे नवे घेऊन ग्रामस्थ आपल्या घरी मार्गस्थ झाले. नवे घरी आणल्यानंतर त्याची उंबरठ्यावर पूजा करून घरात आणण्यात आले. आंब्याची पाने, गंध, हळद, पिंजर या नव्याला लावून हे नवे तोरणाच्या स्वरूपात आकर्षक सजवून घराच्या उंबरठ्यावर लावण्यात आले.