
सावंतवाडी : सातशे वर्षांची परंपरा असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगांव येथील 'माळीचे घर' म्हणजेच घरवडकर राऊळ कुटुंबियांच्या गणपतीला सातव्या दिवशी जल्लोषात निरोप देण्यात आला. या भव्य गणेशमूर्तीची फटाक्यांच्या आतषबाजीसह वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या विसर्जन सोहळ्यासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली होती.
सुमारे सातशे वर्षाहूची परंपरा या गणेशोत्सवाला असून ८५ पेक्षाही अधिक कुटुंबांचा हा गणपती आहे. मळगांव येथील माळीच्या घरचा गणपती म्हणून हा बाप्पा सुप्रसिद्ध आहे. या परंपरेनुसार यावर्षी ही सात दिवसांचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. मळगांव गावातील पाचवे देवस्थान म्हणून ओळख असलेल्या व मळगांवसह सावंतवाडी तालुक्याचे धार्मिक भूषण असलेल्या या गणरायाचे सालाबादप्रमाणे सातव्या दिवशी वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत विसर्जन करण्यात आले.
हा गणेशोत्सव राऊळ कुटुंबियांच्या सामूहिक व कौटुंबिक एकतेचे आदर्श उदाहरण असून दरवर्षी प्रमाणे गणेशोत्सवात गणपती पुजन, ऋषिपंचमी, गौरी पुजन व विसर्जन, सत्यनारायण महापूजा, भजन, फुगडी सहीत लहान व तरुण मुले-मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.माळीच्या घरातील गणेशोत्सव हा पारंपरिक सात दिवसांचा असतो. मुख्य म्हणजे या घरामध्ये सर्वजण एकत्र येऊन रोज काकड आरती, दुपारची आरती व सायंआरती करुन गणरायाची आराधना करतात. तर पहिल्या दिवशी म्हणजेच मूर्ती प्रतिष्ठापनेच्या दिवशी गणेशाचे विधिवत पूजन झाल्यावर गणेशाला ह्या कुटुंबियांकडून वेगवेगळ्या सात प्रकारचा नैवेद्य दाखविला जातो. तसेच सामुहीक भोजनाचा आनंदही लुटला जातो. शिवाय या घरातील प्रत्येक कुटुंबियांकडून गणेशाला आपल्या आवडीचाही नेवैद्य दाखविला जातो. उत्सवाच्या सात दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, लहान मुलांसाठी रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेतल्या जातात. घरातील सर्व कुटुंबातील महिला एकत्र येत रोज गणपतीसमोर विविध प्रकारच्या फुगड्या घालतात. याशिवाय रोज सायंकाळी आरतीनंतर भजन व शेवटच्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे सातही दिवस संपूर्ण घरात भक्तीमय वातावरण असते. सातही दिवस या घरात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांत ज्येष्ठ, तरुण मंडळींसह घरातील लहान मुलेही आनंदाने सहभागी होत असतात. सातव्या दिवशी चोवीस जणांच्या आधाराने श्रींचे भक्तीमय वातावरणात ढोल ताशांच्या गजरात विसर्जन करण्यात आले. परंपरेनुसार श्री रवळनाथ मंदिर समोर या गणपतीन काही वेळ विश्रांती घेतली. शेतातून मार्गस्थ झालेली ही विसर्जन मिरवणूक डोळ्यांच पारणं फेडणारी होती. विसर्जनानंतर सामुहिक भोजन घेऊन राऊळ कुटूंबीय पुढच्या भेटीचे नियोजन करून आपापल्या कामासाठी मार्गस्थ झाले. सात दिवस आपल्या लाडक्या देवाची सेवा केल्यानंतर निरोपाच्या वेळी पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाची आस उराशी बाळगूनच गावातील वेस ओलांडली. यावर्षीही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाला नातेवाईक मळगांव ग्रामस्थ, राजकीय व्यक्ती, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, शिक्षक, उद्योजक, व्यवसायिक, कलावंत आदींसहीत भाविकांनी या गणपतीचे दर्शन घेतले. माळीचेघर मधील अनेक कुटुंबियांनी गणपतीला गाऱ्हाणे घालून सुख समृद्धी, आरोग्य व नोकरी व्यवसायात भरभराट होण्यासाठी साकडे घातले. त्यानंतर भव्य मिरवणुकीने या गणरायाचे थाटात विसर्जन करण्यात आले.