
दोडामार्ग : येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत श्री गणेश सहकार पॅनलने सर्व दहाही जागा जिंकत मोठा विजया मिळवला. ही निवडणूक काल झाली.
या सोसायटीच्या कार्यक्षेत्रात कुंब्रल, कोलझर आणि शिरवल अशी तीन गावे येतात. आतापर्यंत या सोसायटीची कार्यकारिणी निवड बिनविरोध होत होती. यावेळी समृद्धी पॅनल व श्री गणेश पॅनल यांच्यात लढत झाली. काल सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. सायंकाळी उशिरा मतमोजणी पार पडली. यात गणेश पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले. यात रामचंद्र शंकर बोंद्रे, तातोबा ऊर्फ सुदेश वामनराव देसाई, उल्हास आबा देसाई, हनुमंत रामा धुरी, सुर्याजी बाबाजी नांगरे, प्रविण बाबली परब, विलास सखाराम सावळ, विकास रामचंद्र सावंत, कृतिका किशोर देसाई, विशाखा विलास देसाई यांचा समावेश आहे.
विजयानंतर या पॅनलतर्फे निवडून आलेले नव निर्वाचित संचालक सुदेश देसाई म्हणाले," मतदारांनी भरभरून मते दिली आहेत. आम्ही केलेल्या सकारात्मक आवाहनाला त्यांनी साथ दिली त्याबद्दल त्याचे त्रिवार आभार. त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. सर्व सभासदाचे हित जपण्याबरबोरच सगळ्यांना सोबत घेऊन संस्थेचा विकास साधण्याचा पुढच्या काळात प्रामाणिक प्रयत्न करू."
विजयी उमेदवारांचे शिवसेना पदाधिकारी गणेशप्रसाद गवस यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक सामाजिक संस्था पदाधिकारी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.