
सावंतवाडी : 'पीओपी'ची मुर्ती हा पर्याय नसून मातीचीच मूर्ती निसर्गासाठी आवश्यक आहे. निसर्गाकडून घेऊन पुन्हा निसर्गाला देणं हा उद्देश यामागे आहे. त्यामुळे सरकारने मातीच्या मूर्तींना त्या मूर्त्या घडवणाऱ्या मूर्तीकारांना प्रोत्साहन द्यावे, आमचे हात बळकट करावेत असे आवाहन पर्यावरण मूर्तीकार भरत पेडणेकर यांनी केले.
गणपती हा मातीचाच हवा, शास्त्रात तसं लिहीलं आहे. निसर्गाकडून घेऊन पुन्हा निसर्गाला देणं हा उद्देश यामागे आहे. देवी पार्वतीनं मातीपासूनच गणरायाला साकारल होत. त्यामुळे गणपती हा मातीचाच असावा, भले मूर्ती थोडी लहान असेल. मात्र, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा पर्याय निवडू नये. विसर्जनानंतर मूर्तीची विटंबना तसेच निसर्गाचाही ऱ्याह होतो असं मत मूर्तीकार भरत पेडणेकर यांनी व्यक्त केलं. तसेच कोकणवासिय मूर्तीची किंमत करत नाही. पण, वाढलेल्या महागाईमुळे अर्थकारणावर परिणाम झाला आहे. मातीची, रंगांची किंमत वाढली आहे. तरीही गणेशभक्त जी किंमत असेल ती देतो, त्यात कोणता परिणाम झालेला नाही. मूर्तीकाराच मानधन आम्हाला मिळत. गणेशभक्तांच्या उत्साहामुळे आम्हालाही प्रेरणा मिळते. उलट लोक मातीचाच गणपती हवा असा आग्रह धरतात.
दरम्यान, आज अनेक पर्याय उपलब्ध होत आहेत. कागदी लगद्यापासून गणेशमूर्ती तयार केली जाते. परंतु, कागदी लगदा हा पर्यावरणाला हानिकारक आहे. लगद्यापासून हानी पोहचते व प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती तर योग्यच नाही. गोमय गणपती ही संकल्पना चांगली आहे. शाडू मातीचा पर्याय देखील चांगला आहे. तसेच शासनाच्या योजना ग्रामपंचायत स्तरावर मिळत आहेत. मूर्तीकारांना त्याचा खूप चांगला फायदा होत असून अनुदान मिळत आहे. आज मूर्तीकार म्हणून आमची सरकारकडून एकच अपेक्षा आहे. मातीच्या मूर्तींना सरकारनं प्रोत्साहन द्यावं, पीओपी हा पर्याय नाही आहे. माती एका दिवसात विरघळते त्यामुळे आपली परंपरा, वारसा जपण्यासाठी आमचे हात बळकट करावेत असे आवाहन श्री. पेडणेकर यांनी करत इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला.