सावंतवाडीत उद्या 'गंधर्वगान'..!

Edited by:
Published on: November 24, 2023 19:29 PM
views 303  views

सावंतवाडी : पं.कुमार गंधर्व यांचे सुपुत्र आणि प्रथम शिष्य असलेले पं.मुकुल शिवपुत्र हे हिंदुस्थानी अभिजात शास्त्रीय संगीताच्या दुनियेत प्रथमस्थानी असून आचार्य पं. मुकुल शिवपुत्र यांच्या 'गंधर्वगान' या संगीत मैफिलच आयोजन सावंतवाडी राजवाडा येथे उद्या २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आल आहे. त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमासाठी मुकुल शिवपुत्र हे सावंतवाडीत आले असून त्यांनी साथसंगत करणाऱ्या साथीदारांसह गाण्याचा रियाज केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा राज्यातील संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करणारी ही शास्त्रीय संगीत मैफिल आयोजित करण्यात आली आहे. पं. कुमार गंधर्व यांचे सुपुत्र आणि प्रथम शिष्य असलेले पं. मुकुल शिवपुत्र हे हिंदुस्थानी अभिजात शास्त्रीय संगीताच्या दुनियेत प्रथमस्थानी विराजमान आहेत. शास्त्रशुद्ध गायकीसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी संगीतात केलेले प्रयोग संगीतक्षेत्रात शिरसावंद्य मानले जातात.

पंडितजी संस्कृतचे गाढे अभ्यासक आणि संत साहित्याचे जाणकार आहेत. संस्कृत मध्ये काव्यरचना करणारे पंडितजी हे भारतात सध्या एकमेव आहेत. श्रुतिशास्त्राचा सखोल अभ्यास हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्रय, ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर अशा तीन मातब्बर घराण्यांची गायकी ज्यांच्या कंठात माता सरस्वतीच्या रूमाने वसली आहे असे पंडितजी साक्षात गंधर्व म्हणूनच ओळखले जातात.  पं. कुमार गंधर्व जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभरात होणाऱ्या अनेक कार्यक्रमांपैकी काही कार्यक्रम आवर्जून ग्रामीण भागात आयोजित करण्याची इच्छा पंडितजींनी व्यक्त केली होती, सुंदरवाडी नगरीत एक मैफिल व्हावी यासाठी पंडितजींकडे विनंती केली. त्यांच्या या  सुरेल मैफलीत रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन राजन पोकळे यांनी केले आहे.