
मालवण : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांनी मध्यरात्री खोटले धनगरवाडी माळरानावर सुरु असलेल्या जुगाराच्या पटावर धाड टाकली. या कारवाईत फोरव्हीलर (4), मोबाईल, दुचाकी (1) यांसह 1 लाख 43 हजार रोख रक्कम व लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर जुगार खेळण्यासाठी आलेल्या जिल्हाभरातील 15 संशयित आरोपी विरोधात मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई सुरु आहे. अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.
पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग व मालवण पोलिसांनी ही कारवाई केली. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्याद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गचे आशिष यशवंत जामदार यांनी दिली आहे.
1 एप्रिल रोजी रात्री 1.10 वा. खोटले धनगरवाडी, मालवण येथे अंदर बाहर पट जुगारावर पैसे लावून काहीजण जुगार खेळ खेळत असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांनी याठिकाणी धाड टाकली. सुमारे 37 लाख 58 हजार 690 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात रोख रक्कम 1 लाख 43 हजार 390 तसेच मोबाईल फोन, चार चाकी कार 4, मोटार सायकल 1 जप्त करण्यात आले.
जुगार खेळत असल्याप्रकरणी 15 संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यात गुरुनाथ साबाजी नाईक (वय 22) रा. आरोस, गिरोबा वाडी सावंतवाडी, रामचंद्र सदाशिव गुरसाळे (वय 63) रा. पटकी देवी जवळ कणकवली, महेश सुंदर आंबेरकर (वय 40) कणकवली, संजय श्रीधर साळगावकर (वय 50) रा. कट्टा गुरमवाडी मालवण, गणेश सोमा पालव (वय 37) रा. मसुरे मालवण, बाळकृष्ण पांडुरंग वर्धम (वय 68) रा. सातोसे तालुका सावंतवाडी, संतोष बाळकृष्ण कुडतरकर (वय 53) रा. माणगाव कुडाळ, सुरेश श्रीधर कवटणकर (वय 52) रा. कवठणी सावंतवाडी, रोहित राजेंद्र गराटे (वय 29) रा. कासर्डे कणकवली, भीमसेन तुळजाराम इंगळे (वय 41 वर्षे) रा. कलमठ कणकवली, प्रशांत प्रकाश चव्हाण (वय 40) रा. मसुरे मालवण, तुषार नंदकुमार मसुरकर (वय 34) रा. कलमठ कणकवली, अक्षय नारायण चव्हाण (वय 35) रा. कुमामे मालवण, संदीप गोळवणकर रा. कांबळे गल्ली कणकवली, तुकाराम खरात रा. कलमठ कणकवली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरु आहे.
या प्रकरणी मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत अधिक तपास करत आहेत.