
कुडाळ : राज्य शासनाच्या प्रादेशिक पर्यटन योजनेतून डिगस चोरगेवाडी तलाव येथे सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी निखिल कांदळगावकर यांनी आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर गुरूवारी आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार प्रादेशिक पर्यटन योजनेतून डिगस चोरगेवाडी तलाव येथे उद्यान विकसित करणे, पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या पर्यटक सुविधा केंद्राचे बांधकाम करणे, गणेश विसर्जनासाठी सुसज्ज गणेशघाट जेटी बांधकाम करणे, बैठक व्यवस्था करणे व आकर्षक सेल्फी पॉईंट उभारणे या कामासाठी एकूण २ कोटी ५० लक्ष एवढ्या निधीला मंजुरी मिळाली आहे.
कुडाळ तालुक्यातील डिगस चोरगेवाडी तलाव हे मुंबई-गोवा महामार्गावरील पणदूरतिठा पासून जवळ असून येथे गेल्या दोन वर्षांपासून वॉटर स्पोर्ट सुरू आहेत. त्याला पर्यटकांची चांगली पसंती मिळाली असून जर डिगस तलाव परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित झाल्यास पर्यटनवाढीसोबतच डिगस गावातील तरुणांना रोजगार व ग्रामपंचायत प्रशासनाला कर स्वरूपात उत्पन्न मिळेल यासाठी निखिल कांदळगावकर यांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन या परिसराच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर केल्यानंतर आज प्रादेशिक पर्यटन योजनेतून या कामासाठी अडीज कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. याबाबत डिगस गावाच्या वतीने श्री. कांदळगावकर यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त करत या कामाचे भूमिपूजन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.










