देवगड बाजारपेठांमध्ये वाहतुकीची वारंवार कोंडी

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 26, 2024 13:51 PM
views 65  views

देवगड : देवगड येथील देवगड -निपाणी महामार्गावर देवगड -जामसंडे - तळेबाजार येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.अरुंद रस्ते असल्यामुळे या देवगड येथील मुख्य बाजारपेठांमध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे.दुतर्फा बेशिस्त वाहने पार्किंग करून ठेवली जातात; त्यामुळे येथील नगरपंचायत,पोलिसांकडून वाहन चालकांना शिस्त लावण्याची गरज आहे.

देवगड जामसंडे तसेच तळेबाजार मुख्य बाजारपेठेत सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे.मुळातच अरुंद रस्त्याच्या दुतर्फा अस्ताव्यस्त लावलेली वाहने दुकानांचे फलक यामुळे दोन वाहने समोरासमोरून आल्यावर त्यांना बाजू देताना अडचण होते.याबाबत नगरपंचायत आणि पोलिसांनी लक्ष घालून वाहतुकीला शिस्त लावणे गरजेचे आहे. देवगड ची ओळख असलेला देवगड हापूस या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्यामुळे पर्यटक रस्त्याच्या दुतर्फा अस्ताव्यस्त वाहने उभी करून दुकानांमध्ये आंबा खरेदी करण्यासाठी जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

त्यातच परिसरातील विविध गावातून बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांची वाहने रस्त्याच्या दुतर्फास लावली जातात त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या रस्त्याचा मोठा भाग वाहनांच्या पार्किंगसाठी वापरला जातो उपलब्ध जागेतून वाहनांना वाट काढावी लागते ट्रक,एसटी सारखी अवजड वाहने समोरासमोर आल्यास त्यांना बाजू काढणे अवघड होते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. ती पूर्वपद होण्यासाठी मोठा वेळ जातो दिवसभरात सातत्याने हा प्रकार घडत असतो याकडे पोलीस आणि नगरपंचायत प्रशासनाचेही दुर्लक्ष असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत रस्त्याच्या दुतर्फास लावण्यात येणारी वाहने आणि वाहनांचे रस्त्यावर लावलेले जात असलेले फलक काढून रस्त्याला अडथळा होणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी नियम करून त्याची काटेकोर अंमलबजावणी केल्यास यावर मार्ग निघू शकतो नगरपंचायत आणि पोलिसांनी याचा गांभीर्याने विचार करावा व वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे.