
सिंधुदुर्ग : श्री साईसिध्दी बोटचे मालक संजय तातू केरकर, रा. दाभोसवाडा, वेंगुर्ला याने बोटीवरील खलाशांची बायोमेट्रीक कार्ड दाखविण्यास सांगितल्याचा राग मनात धरुन फिर्यादी कांचन एकनाथ कुमठेकर, पोलीस उपनिरिक्षक यास शिवीगाळ व धमकी दिली म्हणून केरकर याच्याविरुध्द वेंगुर्ले पोलीसांनी भा.द.वि. कलम ३५३, ५०४ व ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करुन वेंगुर्ले न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ही केस सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत असल्यामुळे ती सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आली. याकामी अति. सत्र न्यायाधीश, व्ही. एस. देशमुख यांनी सबळ पुराव्याअभावी आरोपीची मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. अजित भणगे, ॲड. मिहीर भणगे, ॲड. स्वप्ना सामंत, ॲड. सुनिल मालवणकर, ॲड. तेजाली भणगे व ॲड. आशुतोष कुळकर्णी यांनी काम पाहिले.
यातील हकीगत अशी की, दिनांक २९.०३.२०१८ रोजी सकाळी ११.०० वाजता पोलीस उपनिरिक्षक, सेकंड क्लास मास्टर, नेमणूक सागरी सुरक्षा विभाग, शाखा- वेंगुर्ला हे आपल्या स्टाफसह पोलीस डींगी नं. १ घेऊन समुद्रात पेट्रोलींगसाठी रवाना झाले. ते निवती समुद्राच्यादिशेने जात असताना गांव मौजे खवणे समोरील समुद्रात श्री साईसिध्दी बोट जी संजय तातू केरकर यांच्या मालकीची होती, ती आढळून आली. त्या बोटीवर एकूण ४ खलाशी होते. कुमठेकर यांनी केरकर यांजकडे बोटीवरील इसमांची बायोमेट्रीक कार्ड आहेत अगर कसे, याची चौकशी केरकर यांच्याकडे केली. त्यांनी ती वेंगुर्ला जेटीवर आणून दाखवितो, असे सांगितले. दुपारी ४.०० वाजण्याचे दरम्याने संजय तातू केरकर हा सागरी सुरक्षा विभागास दिलेल्या अस्मिता स्पीड बोटवर आला व फिर्यादी यास उद्देशून बायोमेट्रीक कार्ड चेक करता काय, मी तुम्हांला कार्ड चेक करु देणार नाही, तुम्ही माझे काही वाकडे करु शकत नाही, मी तुम्हांला सोडणार नाही व तुमच्या बोटीला माझ्या बोटीने टक्कर मारीन, असे सांगून धमकावून मालवणी भाषेत शिवीगाळ केली म्हणून केरकर याच्याविरुध्द वेंगुर्ले पोलीसांनी भा.द.वि. कलम ३५३, ५०४ व ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करुन वेंगुर्ले न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदरची केस जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आली. त्याकामी सरकारी पक्षाने एकूण ५ साक्षीदार तपासले. त्यात पंच व तपासी अंमलदार रुपाली गोरड यांची साक्ष झाली.
तपासात आलेल्या विसंगती व आरोपी याची फिर्यादी याजबरोबर असलेली वाकडीक याचा विचार करुन अति. सत्र न्यायाधीश, व्ही. एस. देशमुख यांनी सबळ पुराव्याअभावी आरोपीची मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. अजित भणगे, ॲड. मिहीर भणगे, ॲड. स्वप्ना सामंत, ॲड. सुनिल मालवणकर, ॲड. तेजाली भणगे व ॲड. आशुतोष कुळकर्णी यांनी काम पाहिले.