ATM कार्डद्वारे मोफत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन

जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत कलमठ
Edited by: उमेश बुचडे
Published on: November 23, 2023 17:28 PM
views 191  views

कणकवली : कलमठ ग्रामपंचायत चे महिला स्नेही उपक्रम हे कौतुकास्पद आणि अनुकरणीय असे आहेत.किशोरवयीन मुली आणि गरजू महिलांसाठी दरमहा मोफत सॅनिटरी नॅपकिन पुरवठा करण्यासाठी एटीएम कार्डद्वारे  सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन उपलब्ध करून देणारी कलमठ ही सिंधुदुर्गातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. महिलांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडित मासिक पाळी हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. मासिक पाळी दरम्यान घ्यावयाच्या स्वच्छता आणि आरोग्यविषयक दक्षतेबाबत विचार करणे आणि खुलेपणाने बोलणे अत्यावश्यक आहे. कलमठ ग्रामपंचायत ने महिलांच्या या आरोग्यविषयक विषयाबद्दल कृतिशील उपक्रम राबवून महिलांच्या आणि पर्यायाने समाजहिताचा विचार केला आहे.

कलमठ ग्रामपंचायतचा या स्तुत्य उपक्रमाचे अनुकरण जिल्ह्यात सर्व गावांत आणि शहरांत सुद्धा होईल असे प्रतिपादन कवयित्री सरिता पवार यांनी केले. कलमठ ग्रामपंचायत च्या वतीने आपला गाव आपला विकास अंतर्गत सॅनिटरी पॅड वेंडिंग एटीएम मशीन चे लोकार्पण तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रनोती इंगवले यांच्या हस्ते करण्यात आले. तर एटीएम कार्ड चे वितरण कवयित्री सरिता पवार व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरिता पवार बोलत होत्या.यावेळी कलमठ सरपंच संदिप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर,  माजी पं स  सभापती मिलिंद मेस्त्री, तंटामुक्ती सदस्य तथा माजी पं स सदस्य महेश लाड, वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली वळंजू, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, सीएचओ सुविधा सावंत, तन्वीर शिरगावकर, शैलेजा मुखरे, श्रद्धा कदम, ग्रामपंचायत सदस्य नितीन पवार,  स्वाती नारकर, दिनेश गोठणकर, पपू यादव, सुप्रिया मेस्त्री, नजराणा शेख, प्रमोद लिमये, अबा कोरगावकर, मिलिंद चिंदरकर, विजय चिंदरकर, परेश कांबळी, स्वरूप कोरगावकर, समर्थ कोरगावकर , ग्रा पं कर्मचारी अण्णा सावंत, गणेश सावंत, खुशाल कोरगावकर, महेंद्र कदम , आशा सेविका उपस्थित होते.

यावेळी बोलताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंगवले म्हणाल्या की, किशोरवयीन मुली आणि गरजू महिलाना मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देत कलमठ ग्रामपंचायत ने स्तुत्य उपक्रम राबवत महिलांच्या आरोग्यविषयक असलेली आपली जागरूकता दाखवून दिली आहे.वापरण्यात आलेल्या सॅनिटरी पॅड ची विल्हेवाट लावतानाही डीसपोजेबल मशीन चा वापर करण्यात येत असल्याने यातून महिलांचे आणि विशेषतः किशोरवयीन मुलींचे आरोग्य जपले जाणार आहे.सरपंच संदीप मेस्त्री म्हणाले की, कलमठ गावातील 1 हजार किशोरवयीन मुली आणि गरजू महिलांना याद्वारे दरमहा मोफत सॅनिटरी नॅपकिन पुरवठा कलमठ ग्रा पं करणार आहे.गावात एकूण 5 ठिकाणी  मोफत सॅनिटरी  एटीएम वेंडिंग मशीन बसवण्यात येणार आहेत.

वापरलेल्या सॅनिटरी पॅड च्या विल्हेवाटी साठी सुद्धा ग्रामपंचायत च्या वतीने डीस्पोजेबल मशीन बसविण्यात येणार आहेत. प्रत्येक किशोरवयीन मुलगी आणि गरजू महिलेला यासाठी कलमठ ग्रामपंचायत ने बनविलेले एटीएम कार्ड दिले जाणार आहे. दरमहा 25 दिवसांनी हे कार्ड वापरून या व्हेंडिंग मशीन मधून 5 सॅनिटरी पॅड उपलब्ध होतील.याद्वारे गावातील किशोरवयीन मुली आणि महिलांचे आरोग्यहित जपण्याचा प्रयत्न कलमठ ग्रामपंचायत करणार आहे.