
सावंतवाडी : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहातील बंदिवानांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ६५ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिरात बंद्यांची जनरल चेकअप, हृदय व मधुमेह तपासणी, डोळ्यांची तपासणी, हाडांची तपासणी आणि रक्तगट तपासणी करण्यात आली. तसेच डॉ. हर्ष ईश्वरा सागावकर, अहिल्या मेडिकलचे मालक आनंद रसम आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय यांच्या सहकार्याने बंद्यांना मोफत औषधे उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी ॲड. पूजा नाईक विधी सेवा समिती यांनी बंद्यांना कायदेविषयक मार्गदर्शन केले.
तर प्राध्यापक रुपेश पाटील यांनी बंद्यांचे मनोबल वाढवणारे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तर सामाजिक बांधिलकी संस्थेचे अध्यक्ष सतीश बागवे यांनी बंद्यांना त्यांच्या सुटकेनंतरच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी आपला दवाखानाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्ष ईश्वरा सागावकर, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल अवधुत, आयुर्वेदिक कॉलेजचे डॉ. नंददीप चौडणकर, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. अक्षय नाईक, उपजिल्हा रुग्णालयाच्या एनसीडी समुपदेशक,अदिती कशाळीकर आदी उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे यांच्या नेतृत्वाखाली रवी जाधव, रूपा मुद्राळे, शरदनी बागवे, लक्ष्मण कदम, समीरा खलील आणि हेलन निबरे यांनी शिबिराच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.
यावेळी ज्येष्ठ नागरिक अरुण मेस्त्री यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना, "आजच्या धावपळीच्या युगात सर्व प्रकारच्या सामाजिक क्षेत्रात सातत्य ठेवून वावरणे सोपे नाही. संस्थेने हे करून दाखवले, याचा मला अभिमान वाटतो," असे मत व्यक्त केले. तसेच कारागृह अधीक्षक सतीश कांबळे आणि वरिष्ठ तुरुंग अधिकारी संदीप एकशिंगे यांनी देखील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक केले.