स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान !

चिपळूण उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी मोफत आरोग्य शिबीर
Edited by: मनोज पवार
Published on: September 13, 2025 19:55 PM
views 94  views

चिपळूण : भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय कामथे, चिपळूण येथे “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” अंतर्गत मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हा शिबीर बुधवार दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सुरू होऊन संध्याकाळी ५ वाजता समाप्त होईल.

आरोग्य शिबीरामध्ये सर्व वयोगटातील नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी आणि उपचार सुविधा उपलब्ध असणार आहेत. शिबीरात स्त्रीरोग, हृदय रोग, मधुमेह, त्वचारोग, मानसिक आजार, मूत्रपिंडाचे आजार, अस्थिरोग, हर्निया, हायड्रोसिल, अपेंडिक्स, मिरगी (फिट), गुप्तरोग, एचआयव्ही/एड्स, नेत्र आणि गर्भाशयाचे आजार यासह बालरोगांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत.

याशिवाय दंत तपासणी, मौखिक आरोग्य तपासणी व उपचार, रक्त व लघवी तपासणी, शुगर, ईसीजी इत्यादी तपासणी, सोनोग्राफी तपासणी, स्तन व गर्भाशयाचे कॅन्सर तपासणी, क्ष-किरण, सीटी स्कॅन तसेच रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहेत. शिबीरात विविध आरोग्य जनजागृती स्टॉल्सद्वारे आरोग्यविषयक माहिती व सल्ला देखील प्रदान केला जाणार आहे.

या आरोग्य शिबीराचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, वैद्यकीय अधिक्षक डॉ. असित नरवाडे आणि स्त्रीरोगतज्ञ व नोडल अधिकारी डॉ. कांचन मदार यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या शिबीराद्वारे नागरिकांना मोफत तपासणी करून घेण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. कांचन मदार यांनी दिली आहे.

नोडल अधिकारी डॉ. कांचन मदार यांनी नागरिकांना शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन करत महत्त्वाच्या आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी होणार असून आरोग्य संवर्धनाला चालना मिळेल, असे सांगितले.