बोगस खत कंपन्यांकडून होतेय फसवणूक

देवगडमधील बागायतदारांचा आरोप
Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 12, 2024 14:15 PM
views 112  views

देवगड : देवगड हापूस आंबा हंगाम संपताच पावसापूर्वी आंबा कलमांना खताची मात्रा दिली जाते.यावेळी आंबा बागायतदारांकडून मोठ्या प्रमाणात खत खरेदी केले जाते. याच संधीचा फायदा घेत घाटमाथ्यावरील बोगस खत कंपन्या थेट आंबा बागायतदारांना गाठून बोगस खत बागायतदारांच्या माथी मारत आहेत.सध्या देवगड तालुक्यात बोगस खत विक्रेत्यांनी धुमाकूळ घातला असून कोट्यवधी रुपयांचा गंडा आंबा

बागायतदारांना घातला आहे. मात्र याकडे कृषी विभाग व गुणवत्ता तपासणी पथक दुर्लक्ष करीत असल्याचे उघड झाले आहे.देवगड हापूस आंबा हा जगप्रसिद्ध आहे. पण हे उत्पादन घेताना आंबा बागायतदारांना मेहनत घ्यावी लागते. आंबा बागायतदार जून महिन्यापासून साधारणतः जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत आठ ते नऊ महिने मेहनत घेतो, कष्ट करतो. 

आंबा हंगाम मे महिन्यात संपताच झाडांना खताची मात्रा, पालापाचोळा, त्यानंतर कीटकनाशकांची फवारणी सुरू करतो. ही फवारणी फेब्रुवारीपर्यंत सुरू असते.आंबा बागायतदार पुढील हंगामाची सुरुवात खत घालण्यापासून करतो. शासनाने मान्यता दिलेली सेंद्रिय खते अधिकृत विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. आंबा बागायतदार तेथून खरेदी करतोः मात्र घाटमाथ्यावरील बोगस खत

कंपन्या यावेळी कोकणात उतरतात. ही बोगस खते आंबा बागायतदारांच्या माथी मारण्यासाठी मार्केटिंगचे मोठे जाळे पसरतात.देवगडसह जिल्ह्यात सुमारे ७० हून अधिक बोगस खतांचे मार्केटिंग करत असलेल्या व्यक्ती आहेत. बाजारात अधिकृत सेंद्रिय खताची ११५० रुपयांना मिळणारी बॅग बोगस कंपन्या आंबा बागायतदारांना गाठून ७५० रुपयांना विकत आहेत. आंबा बागायतदारांना आमिष दाखवून तसेच भूलथापा मारून फसवणूक केली जात आहे.

देवगड तालुक्यात ग्रामीण भागात बोगस खताचे मोठे ट्रक १५-१५ टन खत आंबा बागायतदारांच्या गळी उतरवत आहेत. मात्र कमी किमतीत खत मिळत असल्याने आंबा बागायतदार या कंपन्यांच्या आमिषाला भुलत आहेत.

गेल्या हंगामामध्ये बोगस कंपन्यांनी थ्रीप्स रोगावर मोठ्या प्रमाणात कीटकनाशके विकली. आंबा

कलमावरील थ्रीप्स रोगावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बोगस कंपन्यांचे एजंट पळून गेले पण आंबा बागायतदारांनी स्थानिक विक्रेत्यांवर त्याचा राग काढला. मात्र, कृषी विभाग व गुणवत्ता तपासणी पथकाने ऐनवेळी हात झटकले. बोगस कंपन्यांना कृषी विभाग व

गुणवत्ता तपासणी पथकाच्या अधिकाऱ्यांकडूनच आर्थिक तडजोड करून अभय दिले जाते. बोगस खताची किंवा कीटकनाशकाबाबत आंबा बागायतदारांनी तक्रार केली तर, त्यांनाच पुराव्यासह पकडून आणा म्हणून सांगितले जाते. तसेच बोगस कंपन्यांना पकडून दिल्यानंतर त्यांच्यावर कारवाई न करता त्यांच्याशी आर्थिक तडजोड करून त्यांना सोडले जाते. आंबा बागायतदार संघटनेने या घटनांबाबत जागरूक असणे महत्त्वाचे आहे.


आतातरी कारवाई त्यांच्यावर होणार का ?

देवगड तालुक्यातील व रत्नागिरी जिल्ह्यातील बोगस खत कंपन्यांवर कारवाई होणार का? ग्रामीण भागात कंटेनर आणून बोगस खत विकणाऱ्या एजंटांवर कारवाई होणार का? कृषी विभाग व गुणवत्ता तपासणी विभाग शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करणार का? असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.