मिशन रेबीजच्या चार गाड्यांचं नुकसान

माणुसकी धाब्यावर
Edited by:
Published on: April 28, 2025 15:30 PM
views 276  views

सावंतवाडी : शहरात अज्ञात इसमाकडून मिशन रेबीजच्या चार गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले आहे. शनिवारी पहाटे एका अज्ञात व्यक्तीकडून मिशन रेबीज या संस्थेच्या चार मोठ्या गाड्यांचे मोठया प्रमाणात नुकसान करण्यात आले. या चारही गाड्या भटक्या तसेच पाळलेल्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वापरण्यात येतात. 

हा संघ स्वतः चा जीव धोक्यात घालून नागरिकांचा रेबीज सारख्या भयानक रोगामुळे मृत्यू होऊ नये यासाठी काम करतो. तरीसुद्धा काही समाजकंटकांकडून चोरीच्या उद्देशाने हे कृत्य झाले आहे असा अंदाज वर्तवला जात आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. लवकरात लवकर त्या व्यक्तीचा शोध लावून योग्य ती शिक्षा देण्यात यावी अशी विनंती संस्थेचे शिक्षण अधिकारी अमित नाईक यांनी केली आहे. मिशन रेबीज ही संस्था रेबीज सारखा जीवघेणा रोग सिंधुदुर्गातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून संपुष्टात आणावा यासाठी  दिवस रात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करते.

पण असे कृत्य करून माणुसकी धाब्यावर बसवलेली आहे हे सिद्ध होते. काही समाजकंटकांमुळे कोणत्याही चांगल्या गोष्टी सिंधुदुर्गात होणार नाहीत असेही अमित नाईक म्हणाले. पण कितीही त्रास दिला तरी सुद्धा रेबीज रोग संपुष्टात आणू आणि या रोगामुळे कोणत्याही सिंधुदुर्ग वासियांचा जीव जाणार नाही यासाठी आम्ही काम करतच राहू असे आश्वासन अमित नाईक यांनी दिले आहे.