
दिव्यांग बांधवांना घेऊन साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा
कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या सत्ताधार्यांनी प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले असते तर कणकवलीच्या गारबेज डेपोला लागलेली आग वेळेत विझली असती. गारबेज डेपोची आम्ही पाहणी केली असून तेथे अनेक मशिनरी बंदावस्थेत आहेत, अशी टीका माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक बंडू हर्णे यांनी केली. तर दिव्यांग बांधवांसाठी २ लाख ८० हजार रुपये निधी असून यातील एका दिव्यांग बांधवाला १ लाखा ८० हजाराची दुचाकी देण्याचा निर्णय सत्ताधार्यांनी घेतला आहे. त्यामुळे उर्वरित दिव्यांग बांधवांवर अन्याय होणार असून याविरोधात येत्या १ मे रोजी, महाराष्ट्रदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहरातील दिव्यांग बांधवांसमवेत साखळी उपोषण करणार असल्याचा इशाराही हर्णे यांनी दिला.
येथील समीर नलावडे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. हर्णे बोलत होते. यावेळी नगरसेविका मेघा गांगण, प्रतिक्षा सावंत, मनस्वी ठाणेकर, नगरसेवक स्वप्नील राणे उपस्थित होते. बंडू हर्णे म्हणाले, कणकवली नगरपंचायतीच्या भाजपच्या गटनेत्या सुप्रिया नलावडे यांच्यासह आम्ही भाजपच्या नगरसेवकांनी गारबेज डेपोची पाहणी केली. गारबेज डेपोला शनिवारी आग लागली. ही आग सर्व डपिंग ग्राऊंडला लागली. आग विझविण्याबाबत नगरपंचायतीकडून काही प्रमाणात प्रयत्न झाला असला तरी त्यात सातत्य नाही. अन्यथा ही आग वेळेत विझली असती. गारबेज डेपोच्या पाहणीत अनेक बाबी निदर्शनास आल्या. येथील खत निर्मितीची प्रक्रीया सध्या बंद आहे. सुक्या कचर्याबाबतची फिलिंग मशिनही बंद आहे. किती टन कचरा आहे, याचे मोजमाप करणारे युनिटही बंद आहे. याबाबत आम्ही मुख्याधिकारी यांची भेट घेणार आहोत.
हर्णे पुढे म्हणाले, दिव्यांग बांधवांना निव्वळ नफ्याच्या ५ टक्के मदतनिधी देण्याची न. पं. मध्ये तरतूद आहे. यावर्षी २ लाखा ८० हजार रुपये एवढा निधी असून ५८ लाभार्थी आहेत. एका लाभार्थ्याला साधारण ४ हजार ८२७ रुपये मिळू शकतात. पण नगराध्यक्षांच्या एका दिव्यांग कार्यकर्त्यांनी दुचाकीची मागणी केली असून त्याची किंमत १ लाख ८० हजार रुपये आहे. परिणामी उर्वरित ५७ दिव्यांग बांधवांना देण्यासाठी केवळ १ लाख रुपये राहतात. यातून प्रत्येक बांधवाला १ हजार ७५४ रुपयेच मिळू शकणार आहेत. अर्थातच हा उर्वरित दिव्यांग बांधवांवर अन्याय आहे. कुणा एकाला खुश करण्यासाठी उर्वरित दिव्यांग बांधवांवर अन्याय होणार असेल तर येत्या १ मे रोजी, शहरातील दिव्यांग बांधवांसमवेत साखळी उपोषणास बसणार असल्याचा इशाराही हर्णे यांनी दिला.
सत्ताधारी सध्या फोटोग्राफी, शो शायनिंगमध्ये गुंतले आहेत. प्रशासनाकडून काम करून घेणे ही सत्ताधार्यांची जबाबदारी आहे. मात्र, सत्ताधारी टेंडर भरण्यामध्ये मश्गुल असल्याची टिकाही हर्णे यांनी केली. कुत्र्यांच्या बंदोबस्ताबाबत मोहीम राबविण्यात येत होती. सध्या ही मोहीम बंदावस्थेत आहे, असेही हर्णे म्हणाले. मेघा गांगण म्हणाल्या, नरडवे रस्त्यावर मच्छिविक्रेते बसत असल्याबाबत आम्ही न. पं. सभेत लक्ष वेधले होते. नगराध्यक्षांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही मचिछविक्रेते नरडवे रस्त्यावर मच्छीविक्री करताना दिसतात. परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. नगरपंचायतीचे मच्छीमार्केट असूनही हे विक्करेते रस्त्याच्या बाजूला विक्री करत असून याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, असेही गांगण म्हणाल्या.










