माजी सैनिक नामदेव सावंत यांना अखेरचा निरोप

Edited by: विनायक गांवस
Published on: March 27, 2026 18:44 PM
views 57  views

सावंतवाडी : भारतीय सैन्य दलातील 16 मराठा लाईफ इन्फंट्रीचे निवृत्त सुभेदार महाराष्ट्र राज्य शासन मान्य पुननियुक्त माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव रामचंद्र सावंत (वय 53) यांचे गुरुवारी निधन झाले होते. त्यांच्यावर शुक्रवारी त्यांच्या मूळ गावी दाणोली गावठाण येथे लष्करी प्रथेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने आजी-माजी सैनिक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

नामदेव सावंत यांच्या निधनाची माहिती दाणोली येथील गावातील ग्रामस्थांना समजताच अनेकांनी शोक व्यक्त केला. श्री. सावंत हे गुरुवारी दुपारी बाहेरगावाहून एसटी बसने आले होते. ते बस स्थानकावर उतरल्यानंतर तेथील स्वच्छतागृहात गेले असता तिथेच त्यांना चक्कर येऊन खाली कोसळले. आजूबाजूच्या नागरिकांनी धावाधाव केली. मात्र, तत्पूर्वीच सावंत यांचे निधन झाले होते. ह्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांचा मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालय हलविण्यात आला. तेथे शवविच्छेदन केल्यानंतर शुक्रवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नामदेव सावंत हे सेवाभावी वृत्तीचे होते.त्यामुळे त्याच्याबद्दल अनेकात आपुलकी होती.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी दाणोली गावठाण येथील निवासस्थानी धाव घेतली.

यावेळी आजी माजी सैनिक पोलिस ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लष्करी प्रथेनुसार नामदेव सावंत यांना मानवंदना देण्यात आली. तसेच भारतीय ध्वज अर्पण करण्यात आला. यावेळी माजी सैनिकांनी नामदेव याच्या आठवणी जागवल्या यावेळी सैनिकांच्या विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.