
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाच्या सर्वोच्च यंत्रणेमध्ये म्हणजेच आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई येथे २७ मार्च २०२६ रोजी एक अत्यंत महत्त्वाची बैठक संपन्न झाली. राज्याचे माजी आरोग्यमंत्री दिवंगत नामदार भालचंद्र अनंत तथा भाईसाहेब सावंत यांच्या नावे आरोग्य विभागात एका विशेष कक्षाची स्थापना करून, त्याद्वारे सुसज्ज आरोग्य यंत्रणा निर्माण करण्याबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. समाजातील अतिगंभीर आणि दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या तळागाळातील सामान्य जनतेला योग्य न्याय मिळावा आणि त्यांना अद्ययावत वैद्यकीय उपचार उपलब्ध व्हावेत, ही संकल्पना कै. विकास सावंत यांची होती. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव शासन दरबारी मांडण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. मात्र, विकास सावंत यांच्या अकाली निधनामुळे हा प्रस्ताव प्रलंबित राहिला. आज त्यांच्या स्मृतींना उजाळा देत हा प्रस्ताव पुनरुज्जीवित करून शासन दरबारी प्रस्तावित करण्यात आला आहे. या उदात्त संकल्पनेचे शासनाकडून स्वागत करण्यात आले आहे. या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी आयोजित पहिल्या महत्त्वाच्या बैठकीस संचालक, आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, पुणे, वरिष्ठ अधिकारी, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान माजी आरोग्यमंत्री दिवंगत भाईसाहेब सावंत यांच्या आरोग्य क्षेत्रातील ऐतिहासिक कार्याची आठवण काढण्यात आली. महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत आणि समाजकारणात असलेले त्यांचे योगदान अधोरेखित करण्यात आले. प्रस्तावित 'भाईसाहेब सावंत आरोग्य कक्षा'च्या माध्यमातून राज्यातील दुर्गम भागातील रुग्णांना मोठ्या रुग्णालयांच्या फेऱ्या न मारता, एकाच छताखाली तज्ज्ञ मार्गदर्शन आणि मदत मिळवून देण्याचा मानस आहे. तळागाळातील लोकांपर्यंत आधुनिक आरोग्य सुविधा पोहोचवणे, हेच या प्रस्तावित कक्षाचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. या कक्षाच्या माध्यमातून सामान्य माणसाला आरोग्य सेवेचा हक्क मिळेल, अशी भावना बैठकीनंतर व्यक्त करण्यात आली.










