
शशिकांत मोरे
रोहा : रोहा तालुक्यात धाटावनगरीत किल्ला धाटाव पंचक्रोशी यांच्या माध्यमातून आयोजित वारकरी सांप्रदायाच्या वतीने सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात रविवारी रात्री हभप नारायण वाजे महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. त्यांच्या कीर्तनाने संबंध रोहा तालुक्यातील वारकरी वर्गासह उपस्थित श्रोतेगणही मंत्रमुग्ध झाल्याचे पहावयास मिळाले.
पंढरपूर येथील प्रख्यात कीर्तनकार हभप नारायण वाजे महाराज यांनी जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा ''माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणचि देव होय गुरू! पढियें देहभावें पुरवि वासना, अंती तें आपणापाशीं न्यावे॥ मागें पुढें उभा राहे सांभाळीत,आलिया आघात निवारावे, योगक्षेम जाणे त्याचे जरी, वाट दावी करीं धरूनियां, तुका म्हणे नाहीं विश्वास ज्या मनीं, पाहावें पुराणीं विचारूनी!'' हा अभंग कीर्तनासाठी घेतला होता.
आपल्या सुश्राव्य कीर्तनातून त्यांनी अनेक विषयांना स्पर्श केला. ते म्हणाले, अभंग श्रीमद्भगवद्गीयेत नाही, अभंग ज्ञानेश्वरीत नाही, अभंग हा गाथेतच आहे.चांगल्या कामासाठी येतो त्याला राजाचं म्हणायचं, भक्त देवाला जसा विसरत नाही, तसा देव भक्ताला विसरत नाही. देवाने दिलेली संधी कधीही सोडू नका, किती जरी विघ्न आली तरी नामस्मरण नक्की करा, भजन कीर्तन करतो त्याच्यावरच देवाची दृष्टी होते. साधू संतांच्या महाराष्ट्र भूमीत सांप्रदायला अधिक महत्व असल्याचे ते म्हणाले. मन हे पाण्यासारखे निर्मळ आहे, मनाला जपा. देव आवडण्यासाठी पुण्य असावे लागते,कोणत्याही देवाची सेवा करा, मात्र परमार्थ करा!, असे सांगून आपल्या दीड तासाच्या कीर्तनात त्यांनी अनेक विनोदी उदाहरणे सांगितली.
या सप्ताह कार्यक्रमात राज्याच्या माजी मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा उपस्थिती दर्शविली. वाजे महाराजांच्या कीर्तनाबरोबरच रात्री आयोजित महाप्रसादाचाही त्यांनी आस्वाद घेतला .दरम्यान दुपारी हभप दिनेश महाराज कडव यांचे प्रवचन झाले. तर रात्री बोरघर व लांडर येथील वारकरी मंडळींनी जागर व विणपहारा केला.