
दोडामार्ग : कसई-दोडामार्ग नगरपंचायत स्वच्छ सुंदर शहर बनवण्यासाठी स्वच्छता अभियान अंतर्गत नगरपंचायत कार्यक्षेत्रात विविधांगी उपक्रम राबवीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर टाकाऊ पासून टिकाऊ आणि ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती अशी संकल्पना सत्यात उतरवत स्वतः नगरपंचायतने पुढाकार घेतला आहे. तसा प्रयोग प्रत्यक्षपणे कचरा डेपो येते राबवित शहर वासियाना स्वच्छतेबाबत एक चांगला संदेश दिला आहे.
नगरवासीयांना आपण जे आव्हान करतो त्याचे पहिलं प्रात्यक्षिक आपण करावं या अनुषंगाने नगरपंचायतच्या अधिकारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी राबविलेला हनउपक्रम स्वागतार्ह असून शहरवासीयांनी त्याचं स्वागत केलं आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा ३.० व Toilets २.० अंतर्गत कसई-दोडामार्गच्या घनकचरा प्रक्रिया केंद्राच्या ठिकाणी टाकाऊ कचऱ्यापासून टिकाऊ व ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खताचा वापर हे उद्दिष्ठ डोळ्यासमोर ठेऊन जनजागृती करणारा आगळा-वेगळा वृक्षारोपण कार्यक्रम नुकताच घेतला. त्यात कसई-दोडामार्ग घनकचरा प्रक्रिया केंद्रावर आलेल्या टाकाऊ टायरचा कुंड्या प्रमाणे प्रत्यक्ष वापर करण्यात आला असून त्यातच वृक्षारोपण करण्यात आल आहे. इतकंच नव्हे तर घंटागाडी मार्फत गोळा करण्यात आलेल्या ओल्या कचऱ्यापासून तयार केलेलं कंपोस्ट वृक्षारोपणासाठी वापरण्यात आले.
नगर पंचायतचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण व सीईओ पारितोष कंकाळ यांच्या मार्गर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कसई-दोडामार्ग नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश पाटील, वरिष्ठ लिपिक संजय शिरोडकर व स्वच्छता दूत उपस्थित होते. याच उपक्रमाची शहरात जनजागृती करून स्वतः नागरिक त्यात सहभागी होतील यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती नगरंचायतीच्या स्वच्छता विभागातील अधिकारी सिद्धेश शेगले यांनी दिली आहे.