
कणकवली : शहरातील उड्डाणपूल हे पिलरने उभे केले व काही भाग मातीचा भराव टाकून बॉक्सेलच्या साह्याने उभे केले. पण बॉक्सेल चे काम निकृष्ट पद्धतीने केल्याचा आरोप मागील काही वर्षात झाला कारण त्यातून पाणी वाहने काही भाग कोसळणे या सर्व गोष्टी घडल्यानंतर हा ब्रिज वाहतुकीस सुरक्षित आहे की नाही, याबद्दल प्रत्येकाच्या मनात शंका उपस्थित करण्यात येत होती. पण आता निकृष्ट झालेले बॉक्सेल चे बांधकाम येत्या आठवड्याभरात तोडण्यात येणार आहे. त्यासाठी उड्डाणपूल बंद राहणार आहे. 4 ते 5 महिन्यांत हे बांधकाम पूर्ण होऊन उड्डाणपुलावरून पूर्ववत वाहतूक होईल. दरम्यानच्या काळात दुतर्फा सर्व्हिस रोडवरून वाहतूक सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सूत्रांकडून देण्यात आली.
कणकवली शहरातील एस एम हायस्कुलनजीक समोर उड्डाण पुलाला जोडणाऱ्या बॉक्सेल चे बांधकाम निकृष्ट झाले होते. उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू झाली असली तरीही त्या निकृष्ट बांधकामाच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावून त्या भागावरून वाहने ये जा करणार नाहीत याची दक्षता घेण्यात आली होती. सदर निकृष्ट बांधकामामुळे उड्डाणपूलावरून होणाऱ्या वाहतुकीवेळी मोठा अपघात होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेत महामार्ग प्राधिकरण ने सदर निकृष्ट बांधकाम काढून नव्याने बॉक्सेल बांधण्याचे आदेश ठेकेदार कंपनीला दिले होते. त्यानुसार येत्या आठवड्याभरात सदर निकृष्ट बांधकाम काढून त्याठिकाणी नविन बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी किमान 4 ते 5 महिन्यांचा कालावधी लागणार असून या काळात सर्व वाहतूक दुतर्फा सर्व्हिस रोडवरून सुरू ठेवण्यात येणार आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा फटका या दुरुस्ती काळात वाहतूक कोंडी सारख्या समस्यांमुळे शहरवासीय आणि पादचारी तसेच वाहनचालकांना बसणार आहे. तसेच पोलीस यंत्रणेला वाहतूक कोंडी सुरळीत करताना मोठी कसरत करावी लागणार आहे.