
कुडाळ : संसदपटू आणि कोकणसुपूञ स्व. बॅ. नाथ पै यांच्या नावाने चिपी येथे सुरू झालेल्या विमानतळाला साधारण पाच वर्षे पूर्ण होतील मात्र राजकीय नेत्यांची अनास्था व श्रेयवादाचे राजकारण यामुळे चिपी मुंबई विमानसेवा कायमचं वादाच्या भोवऱ्यात सापडली. जळगाव व नाशिक पेक्षाही मोठी धावपट्टी असताना अनेकदा विमानसेवा खंडीत होते. मात्र वर्षभरापूर्वी मोपा येथे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्याने प्रवाशांना एक चांगली सुविधा उपलब्ध झाली. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे सुरू झाल्याने बॅ. नाथ पै विमानतळ आणखीन दुर्लक्षित रहाणार होता अशा वेळी फ्लाय ९१ या कंपनीने पुढाकार घेऊन चिपी येथून काही महत्त्वाच्या शहरात विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे अधिकारी श्री आशुतोष चिटणीस, श्री नयमीश जोशी आदीनी कुडाळ एम्. आय्. डी. रेस्टहाऊस येथे एम्. आय्. डि सी. इंडस्ट्रीज असोसिएशन, व्यापारी महासंघाचे पदाधिकारी व उद्योजकांची मिटींग घेऊन ही कंपनी चिपी विमानतळा वरून सुरू करत
असलेल्या विमानसेवेची माहिती दिली. सुरूवातीला कंपनी, बेंगलोर, हैदराबाद व पुणे या ठिकाणी ही सेवा सुरू करणार असून त्यानंतर काही तांत्रिक समस्या व हवाई उड्डाण मंत्रालयाच्या आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर जळगाव, मुंबई, शिर्डी, तिरुपती येथेही सेवा सुरू करणार आहे. त्यासाठी कंपनीचे विविध विभागातील अधिकारी काम करत असून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बेंगलोर व हैदराबाद सेवेचा प्रारंभ करणार असल्याची घोषणा कंपनीचे मुख्य महसुल अधिकारी श्री आशुतोष चिटणीस यांनी केली. तसेच उद्योजकांची मागणी विचारात घेऊन काही प्रमाणात कार्गो सेवेचाही प्राधान्याने कंपनी विचार करत असून त्यावरही काम सुरू असल्याचे सांगितले.
याबाबत असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्री आनंद बांदिवडेकर, कार्यवाह अॅड. नकुल पार्सेकर, उपाध्यक्ष डॉ. नितीन पावसकर, विशेष निमंत्रित श्री संतोष राणे, पदाधिकारी व हॉटेल आर एस एन चे मालक श्री राजन नाईक, श्री शशिकांत चव्हाण, व्यापारी संघाचे श्री नितीन वाळके यांनी या विमानसेवे बाबत अनेक मुद्दे उपस्थित केले. या सर्व मुद्यांवर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तपशीलवार माहिती दिली. तसेच विमान तिकीटाच्या दराबाबत आश्वस्त केले.
असोसिएशनचे अध्यक्ष श्री मोहन होडावडेकर यांनी फ्लाय ९१ या कंपनीने बॅ. नाथ पै विमानतळ चिपी सिंधुदुर्ग या पर्यटन जिल्ह्यातील विमानतळाचा योग्य वापर करून विमानसेवा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय योग्य असून या जिल्ह्यातील उद्योजक निश्चितच विमान कंपनीला सहकार्य करतील असा विश्वास व्यक्त केला.