गणपती विसर्जनासाठी न. पं. तर्फे गणपती मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी..!

Edited by:
Published on: September 27, 2023 17:54 PM
views 130  views

कणकवली : उद्या अनंत चतुर्थी दिवशी गणपती विसर्जनाचे  नियोजन कणकवली नगरपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे. कणकवली गणपती सान्याकडे जाणाऱ्या मार्गावर कांबळे गल्ली हनुमान मंदिर नजिक  नगरपंचायतीतर्फे पुष्पवृष्टी केली जाणार आहे. तालुक्यातील बहुतांशी घरगुती गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी केले जाते. शहरातील गणपतींच्या विसर्जनासाठी नगरपंचायत प्रशासनाने नियोजन केले आहे. गणपती सान्यासह अन्य ५ विसर्जन स्थळांच्या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई व निर्माल्य टाकण्यासाठी कलश ठेवले आहेत. गणपती साना येथील जानवली नदीपात्रात गणेशमूर्तीचे विसर्जनासाठी तराफ्याची व्यवस्था केली आहे. गणपती साना येथे मोठ्या संख्येने गणपती विसर्जनासाठी गणेश भक्त वाहने आणतात.यामुळे  वाहतुक कोंडी होते. ती रोखण्यासाठी योग्य नियोजन होणे गरजेचे आहे.

गुरुवारी सायंकाळी घरगुती गणपतीसह कणकवली बसस्थानकातील सार्वजनिक गणपती व मानाच्या संताच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक शहरातून निघणार असून गणपती सान्याच्या ठिकाणी विसर्जनासाठी जाणाऱ्या गणेशमूर्तीवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. याकरिता कांबळे गल्ली येथे स्टेज उभारण्यात आले आहे. सायंकाळी ५ वा. प्रांताधिकारी जगदीश कातकर तहसीलदार दीक्षांत देशपाडे, न. प. चे मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पवृष्टीचा शुभारंभ होईल, यावेळी न. प. अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले होते. १९ सप्टेंबरला घरोघरी गणरायाचे आगमन झाले होते. गणरायाच्या आगमनामुळे सर्वत्र गणेशमय वातावरण आहे. गेले ९ दिवस वाड्या वस्तीमध्ये आरती, भजनांमुळे परिसर निनादून गेला आहे. लाडक्या बाप्पाच्या सेवेत भक्त लीन झाल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळाले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी तालुक्यातील बहुतांशी गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख उपाययोजना देखील करण्यात आली आहे.