...आधी गोट्या सावंतांच्या गडाची एक वीट तरी हलवून दाखवा !

अंकुश जाधवांचं सतीश सावंतांना थेट चॅलेंज !
Edited by: प्रतिनिधी
Published on: March 11, 2023 16:34 PM
views 381  views

सिंधुदुर्ग : मिस्टर सतीश सावंत, तुम्ही कोण आहात? काय झालात आणि कोण होतात, याचा जरा मागोवा घ्या. तुम्ही म्हणा किंवा आमच्या सारखे कैकजण केवळ आणि केवळ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आशिर्वादामुळेच नावारूपाला आलेत आणि अनेक पदे भूषविली आहेत. त्यापैकी तुम्हीही एक आहात, याचं विस्मरण होऊ देऊ नका.  अन्यथा रामेश्वर माफ करणार नाही. उरला प्रश्न आमदार नितेश राणे यांचा अभेद्य गड भेदायचा, जी तुम्ही कोल्हेकुई केली हे संचयन करण्याएवढे सहज सोपे नाही. अगोदर गोटया सावंत रुपी वाघाच्या गडाची एक वीट तरी हलवून दाखवा, असे आव्हान माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी शिवसेना कणकवली विधानसभा मतदारसंघ जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांना दिले आहे.

   सतीश सावंत यांनी देवगड-वैभववाडीचे आमदार नितेश राणे यांचा गड भेदण्याचे आव्हान दिले. याला माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी पत्रकातून जोरदार प्रत्युत्तर दिले. जाधव म्हणाले की, सतीश सावंत यांनी आपला राजकीय प्रवासाचा मागोवा घ्यावा. जी पदे मिळाली ती केवळ राणे यांच्या मुळे मिळाली, हे विसरता येण्याजोगे नाही. तुम्हीच नाही तर आमच्या सारख्या अनेकजणांना पदे भूषविण्याची संधी राणे यांच्यामुळेच मिळाली. हे सर्वसामान्य जनतेलाही अवगत आहे. त्यामुळे सावंत जनता असचं म्हणेल, कोण होतास तू, काय झालास तू. यांचे आत्मभान ठेवून राणे परिवार टीका करा.

ते म्हणाले, तुम्हाला जिल्हाप्रमुख पद देऊन रिचार्ज केल, याबद्दल तुमचे अभिनंदन. परंतु राजकीय राक्षशी महत्वकांक्षेपोटी राणे परिवारावर टीका करत असाल तर त्याला आम्ही उत्तर देणारच. तुम्ही काय म्हणालात आमदार नितेश राणे मतदार संघात विकास कामे करत नाहीत. फक्त स्टंटबाजी करतात. अहो महाशय पाच वर्षे विरोधी आमदार, त्याच्यानंतर परत अडीच वर्षे विरोधी आमदार. ते आता या सहा महिन्यात सत्तेतील आमदार आहेत. त्यांनी सत्तेत नसतानाही आणि आता सत्तेत असताना त्याच ताकतीने मतदारसंघात विकास कामे केली आहेत. ती विकास कामे सतीश सावंत तुम्ही गांधारीसारखी डोळ्यावर पट्टी बांधल्याने कधीच दिसणार नाहीत. कधीतरी चांगल्याला चांगल म्हणा राव, बरकतीला आणि आरोग्यालाही चांगल ते !

तुम्ही काय कोल्हेकुई केली तर आमदार नितेश राणे यांचा गड भेदणार, अहो सावंत हे संचयन करण्याएवढे सोपे आहे का? याची जाणीव तुम्हालाही आहे उगाचच बोलायचे म्हणून नका बोलू  नाहीतर तोंडघशी पडत राहणार. स्वाभिमान पक्षात तुम्ही ही सोबत होताच की. यावर  तुम्ही वक्तव्य करणं, 'मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली' या म्हणीसारखंच आहे. आमदार नितेश राणे यांना आव्हान देण्याअगोदर गोटया सावंत यांच्या गडाची एक तरी वीट हलवून दाखवा. गोटया सावंत आणि त्यांच्या पत्नी सौं संजना यांनी तुम्हाला प्रत्येक वेळी चितपट केलय, हे जिल्हावासियांना माहित आहे. उगाच उंदीराने राजवस्त्र परिधान करून राजा व्हायला जायचं नाही. नाहीतर त्याचा जोकर होतो, यांचे आत्मभान ठेवा आणि गड भेदायची भाषा करा. तुम्हाला आतापर्यंत जे मिळालं ते केवळ राणे यांच्यामुळेच मिळाले आहे, याची जनाची नाही निदान मनाची ठेवा, असे सडेतोड उत्तर माजी समाजकल्याण सभापती जाधव यांनी सतीश सावंत यांना दिले.