
महाराष्ट्र गोवा व कर्नाटक सिमेवर निसर्गाच्या अमाप संपत्तीत आणि सह्याद्रीच्या विशाल डोंगररागांच्या कुशीत वसलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात नवखा तालुका म्हणजे दोडामार्ग ! इथल्या परंपरागत चाली रिती, रूढी - परंपरा आणि आपली संस्कृती, कला याच बरोबर इथला भुरळ घालणारा निसर्ग, जैवविविधतेचा समृध्द वारसा जपणाऱ्या दोडामार्गने आणखीही एक वारसा मागच्या गेल्या अनेक पिढ्यांनी अतिशय निगुतीने जपलाय तो म्हणजे "नाट्यकलेचा" वारसा!
खर तर गोवा हे कलेचं आणि विशेषतः नाट्य कर्मिंच माहेरघर म्हणून ओळखल जात. अगदी याच गोव्याच्या सिमेवर वसलेल्या दोडामार्गला सुद्धा गोव्याप्रमाणेच उत्सव रंगभूमीची नाट्यपरंपरा लाभली आहे. याच तालुक्यात पहिल्यांदाच कलाप्रेमी, कलासक्त उत्सवरंगभूमीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या दोडामार्गमध्ये नाट्यसंमेलन होतंय हे फार सुखावह आहे. सिंधुदुर्ग साहित्य आणि कला अकादमी दोडामार्गने आयोजित केलेला हा भव्य नाट्य संमेलन सोहळा रसिक मनावर आपली अमीट मोहोर उमटवणार याचा आनंद काही वेगळाच असेल अशी भावना या निमित्ताने नाट्य क्षेत्रात वाहून घेतलेल्या माझ्या सारख्या अनेक नाट्य व कला प्रेमिंतून व्यक्त होतेय.
माझ गाव म्हणजे दोडामार्ग मधील सासोली !! नाट्यकलेचे बाळकडू माझे आजोबा कै. गणेश ठाकूर यांच्या समृद्ध अभिनयाने गाजलेल्या विविध प्रयोगांमुळेच बालपणीच मिळाले. माझी जमीन, कृष्णार्जुनयुद्ध, बेबंदशाही अशा अनेक दर्जेदार संहितांमध्ये अग्रणी भूमिका साकारून प्रतिकूल काळातही सासोली ते मुंबई आणि उत्सव रंगभूमी ते व्यावसायिक रंगभूमी वर आपल्या अभिनयाचा त्यांनी ठसा उमटवला होता. खरंतर त्याकाळी समाजात नाटकाला अतिशय दुय्यम दर्जा दिला जायचा. सन्मान तर सोडाच पण अगदी नाटक्या म्हणून हिणवल जाण्याचा तो काळ! त्यानंतर आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत माझे वडील श्री. महादेव ठाकूर यांनीही सगळे व्याप सांभाळत नाट्यकलेला स्वतःला समर्पित केलं.
शिमगोत्सव, रामनवमी उत्सव म्हणजे नाट्यवेड्यांसाठी भारावलेले दिवस! लाईट नसताना अगदी कंदिलाच्या प्रकाशात रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या तालमी, नारळाच्या झावळ्यांचे कलाकारांनीच उभारलेले नाट्यगृह, घरातली कलाकार मंडळींची उठबस, नाटकाआधी दोन दिवस होणाऱ्या संगीत तालमी, या तालमीसाठी ती पायपेटी उघडली की त्यातून येणारा, मनाला धुंद करणारा सुगंध या सगळ्या सगळ्या आठवणी म्हणजे अगदी अत्तराच्या कुपीत जपून ठेवलेल्या मन प्रसन्न, प्रफुल्लित करणाऱ्या सुगंधी आठवणी! या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आज कैक वर्षांनी या आठवणींनी मनाचा ताबा घेतलाय हे खास! नाटकाचा पडदा उघडला की एकामागून एक सादर होणारे प्रवेश रंगमंचावर जसे रंग भरत प्रेक्षकांना कलेच्या दुनियेची सफर घडवतात अगदी तसेच आठवणींचे तरंग एकेक करत मनाला त्याकाळात घेऊन जातात. दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका दोन्ही लीलया पेलताना मी बाबांना जवळून बघत होतो. अफजलखान वध, उघडले स्वर्गाचे दार, चमके शिवबाची तलवार, स्वराज्यरवी, सिमेवरून परत जा, रायगडाचा राजेश्वर, नको जाळू माझं घरटं अशा सामाजिक, ऐतिहासिक व पौराणिक नाटकांमध्ये बाबांनी अनेक भूमिका केल्या. अजूनही आठवतंय 'अफजलखान वध'साठी माझ्या खेळण्यातल्या बॉलचा वापर करून त्यांनी खानाचा कोथळा तयार केला होता. यातलं प्रत्येक नाटक उभं करण्यासाठी या सर्व लोकांनी तेव्हा घेतलेले कष्ट, म्हापशावरून स्वतः हमाली करत डोक्यावरून आणलेले भाड्याचे कपडे या कशालाच खरंच तोड नाही. नाट्यकलेची आवड असलेली पण अशिक्षित मंडळी केवळ आणि केवळ सरावाच्या जोरावर मोठमोठ्या संहितांमध्ये सहज भूमिका करायचे. एकदोन शिकलेली मंडळी कंदीलाच्या प्रकाशात हातात पुस्तक धरून प्राउंटिंग करायचे. हे सगळं तेव्हा अनुभवणं आणि आता त्या आठवणीत रममाण होणं खरंच किती आनंददायी आहे! मोठंमोठ्या नावाजलेल्या कलाकारांची नाटकं पणजी, सावंतवाडी, म्हापसा इथे आली की कसलीही पर्वा न करता वाट्टेल ते करून प्रयोग बघितलेच जायचे.
माझ्या वडिलांची रंगभूमीवरील कारकीर्द अर्ध्यावर असताना लाईट आली, तेव्हा नाटकासाठी लाईटच्या तारा जोडत - जोडत एका वाडीतली लाईट दुसऱ्या वाडीत नाटकस्थळी ही मंडळी घेऊन जात असत. त्यांचे हे कष्ट खरोखर कौतुकास्पद आणि प्रेरणादायी होते. आतासारखी आधुनिक साधने हाताशी नसल्याने रंगभूषाकार तर तासनतास एकेका पात्राचा मेकअप करायचे. करणारे आणि बसणारे दोन्हीही महानच!कलेवरच निस्सीम प्रेमच हे! मग रंगभूषा पूर्ण झाली की हळूच झावळ्या बाजूला करून राम, सीता, शिवाजी महाराज अशी पात्र बघायला बघ्यांची, लहान मुलांची गर्दी व्हायची. केवढ ते कुतूहल असायचं पाहण्याचं!
या सगळ्याबरोबरच एक अनोखी पद्धतही इथे रुळलेली आहे ती म्हणजे ज्या घरातील तरुण, बालकलाकार पहिल्यांदाच नाटकात भूमिका करणार त्या घरातून उपस्थितांचं गोडधोड खाऊ घालून तोंड गोड करणे. यामुळे नव्या कलाकारचं कौतुक आणि त्याला प्रोत्साहन देणं दोन्ही आपसूक साधल जातं. घरातल्या एकाने तरी नाटकात भूमिका करावी असा जुन्या जाणत्यांचा आग्रह आणि हट्टच असायचा. त्यामुळेच ही नाट्यकला आज जिवंत आहे. काही गावांमध्ये नवीन भूमिका करणाऱ्या कलाकाराने नाटक संपल्यावर वेशभूषेतच ग्रामदैवत, उत्सवदैवत, देवदर्शन करायचं असाही प्रघात होता.
तर असा हा नाट्याचा जामानिमा बघत बघत मीही रंगभूमीवर पाऊल टाकलं, त्यावेळी आईने गोडाचा शिरा सगळ्यांना खाऊ घातला होता हे हे पक्क आठवतं, पण माझी ही सुरवात सोपी नव्हती. सतरंज्या घालणे, पडदे ओढणे, सेट लावणे ही सगळी काम मी करत होतो. बाबा दिगदर्शक असले तरी मला संधी मिळत नव्हती. आपला मुलगा म्हणून बाबांनी मला कधीही झुकतं माप दिलं नाही. मन भूमिकेसाठी अगदी उतावीळ झालेलं असायचं आणि वाट पाहूनही ती मिळायचीच नाही. मग मी आईकडे येऊन चिडचिड करायचो, सारखी तिच्यामागे भुणभुण लावायचो, शेवटी आई बाकीच्या कलाकारांना गळ घालायची, जरा ह्याला घ्या स्टेजवर, कसलतरी काम द्या, अगदी शिपायच ही चालेल. शेवटी एकदा शिपाई म्हणून उभं केलं तेव्हाचा आनंद मी शब्दांत मांडू शकत नव्हतो. ही अशी नाटकाची भूक होती म्हणूनच आज नाट्यक्षेत्रात भरारी घेऊ शकलो हे मात्र अगदी खरंय. गेली २५वर्षे उत्सव रंगभूमीवर यशस्वी वाटचाल करत एकच प्यालातील सुधाकर, संगीत मत्स्यगंधातील देवव्रत, रायगडाला जेव्हा जाग येते मधील संभाजीराजे, ती फुलरणीतील प्रो अशोक जहागीरदार, आणि यंदा ५० वा सुवर्णमहोत्सवी 'इथे ओशाळला मृत्यू ' या नाटकाचा दमदार प्रयोग सादरीकरण करत छत्रपती संभाजी महाराज या भूमिका साकारल्या. 'इथे ओशाळला मृत्यू' तील औरंजेबाच्या नकारात्मक भूमिकेसाठी अनेक पारितोषिके पटकावली आठ वर्षांपूर्वी 'शिवगणेश प्रोडक्शन्स' ची स्थापना करून, संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित २५० कलाकारांचं 'शिवरत्न संभाजी' हे महानाट्यही याच तालुक्यातल्या तरुणाईला साथीला घेऊन उभं केलं. महानाट्यचं लेखन, दिगदर्शन, नेपथ्य आणि भूमिका सर्व जबाबदाऱ्या पार पाडता आल्या त्याबद्दलही श्रीगणेश व श्री नटेश्वर चरणी साष्टांग दंडवत! इथे ओशाळला मृत्यू वर तर प्रेक्षकांनी न भुतों भविष्यती अस प्रेम केलं! पुण्यासारख्या शहरात मागील वर्षी रेकॉर्डब्रेक गर्दी व अलोट प्रेम प्रेक्षकानी बहाल केलं. ती फुलराणी व इथे ओशाळला मृत्यू या नाटकाचे तिकीट विक्रीवर विक्रमी हौसफुल्ल प्रयोग झाले. एकाच शहरात तब्बल ६ वेळा 'इथे ओशाळला मृत्यू' चे तुफान गर्दीतले प्रयोग ही हॅटट्रिकच होय. तसेच दोन वर्षांपूर्वी सावंतवाडीत राजवाड्यात 'इथे ओशाळला' ला प्रत्यक्ष युवराज लखमराजे भोसलेंनी संपूर्ण प्रयोगालाच वन्स मोअर दिला , हा क्षण नाट्यसृष्टीत आमच्या दृष्टीने इतिहास घडवणारा एक अभूतपूर्व सोनेरी क्षणच होता !! या सगळ्यासाठी रसिक, मायबाप प्रेक्षकांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.
या सगळ्या प्रवासात या वर्षी थाटामाटात स्वलिखित अफजलवधावर आधारित इतिहासातील पहिलवहिल ट्रीकसिनयुक्त 'नरसिंह शिवराय' हे नवनाट्यही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलंय. खर तर हाही रंगदेवतेचा कृपाप्रसादच म्हणावा लागेल.
एकूणच हे सारं माझ्या दोडामार्गच्या समृध्द नाट्य परंपरेचच हे फलितच म्हणावं लागेल. अशा या कलेचा वरदहस्त लाभलेल्या तालुक्यात पहिल्यांदा अखिल भारतीय नाट्य संमेलन आयोजित होतंय खरंच आमच्या सारख्या कलानिष्ट व नाट्यवेड्या कलाकारांसाठी हा सुवर्ण दिवस होय. आज सिंधुदुर्ग साहित्य आणि कला अकादमीमुळे हा अखिल भारतीय नाट्य संमेलन सोहळा पार पडतोय ही बाब अतिशय अभिमानाची आणि अभिनंदनीय आहे. आणि ही धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर सक्षम व खंबीर घेतली आहे, ते सिंधुदुर्ग साहित्य व कला अकादमी दोडामार्गचे कार्यवाह प्रकाश गवस आणि त्यांच्या या संकल्पनेला तितकाच आर्थिक भार उचलून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष सुरेश दळवी यांना तालुक्यातील नाट्यक्षेत्रातील सर्व तमाम कलाकार मंडळीकडून मानाचा मुजरा. स्वतः अनेक नाटकांना यशस्वी दिग्दर्शन, भूमिका करणारे, ख्यातनाम इतिहास अभ्यासक प्रकाश गवस यांच्या नाट्यकलेच्या कारकिर्दीतील हा एक "मानाचा तुरा रोवणारा" क्षण असेल असं म्हटल्यास ते बिलकुल वावग ठरणारे नाही. आण अगदी या नाट्य संमेलनाला तितक्याच ताकदीने नाट्य रसिकांपर्यंत पोहचवण्याची ज्यांनी फार मोठी जबाबदारी पार पाडलीय ते आमचे प्रसार मध्यम व मीडियातील सर्व प्रतिनिधी विशेषतः कोकणच्या मातीतील प्रथम दैनिक कोकणसाद व कोकणचं नंबर १ महाचॅनल कोकणसाद LIVE चे मनापासून आभार ..!
गणेश महादेव ठाकूर
युवा नाट्यकर्मी व नाट्य दिग्दर्शक, सासोली - दोडामार्ग