
सावंतवाडी : राजापूर तालुक्यात हवेत गोळीबार करून पलायन करणाऱ्या तिघा जणांना आंबोली येथील चेक पोस्टवर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मात्र त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग पोलिसांना रत्नागिरी पोलीस यंत्रणेकडून बिनतारी संदेश मिळाला होता. स्विफ्ट गाडी एम एच १४ जेए ४१५५ व पांढऱ्या रंगाची फॉर्चून गाडी पूर्ण ९०९० या गाडीतील व्यक्तींनी राजापूर तालुक्यातील कोंडे तर्फ सौंदळे याठिकाणी हवेत गोळीबार करून सिंधुदुर्गच्या दिशेने पलायन केले आहे.या माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकाबंदी केली होती.दरम्यान पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास या क्रमांकाची गाडी आंबोली चेकपोस्टवर निदर्शनास येताच याठिकाणी असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल डी. बी.शिंदे,पोलीस नाईक एम.सी. शिंदे,होमगार्ड जंगले यांनी या स्विफ्ट कारची तपासणी केली असता त्यामध्ये संशयित तीन व्यक्ती दिसून आल्या.त्यामध्ये चालक प्रवीण परमेश्वर पवार (२५,रा.तांबाळे जि. सोलापूर),शेखर नेताजी भोसले(रा.खवणे जि. सोलापूर) व प्रेमकुमार जेटाराम चौधरी(२३,राजस्थान) यांचा समावेश असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.त्यांची अंगझडती घेतली असता टपाल बुक व्यतिरिक्त अन्य काहीही सापडून आले नाही.पुढील कार्यवाहीसाठी त्या तिघांना दुरक्षेत्राच्या ताब्यात देण्यात आले आहे.