
कुडाळ : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा नजीक असलेल्या डॉन बॉस्को चर्चच्या इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या भागात आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमाराला आग लागली. नागरिक तसेच कुडाळ न प आणि एमआयडीसीच्या अग्निशमन बंबानी वेळीच धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले आणि आग विझवली. या आगीत कोणतीही प्राणहानी झाली नसली तरी तिथे मोठ्या संख्येने असलेल्या प्लास्टिक खुर्चा जळाल्याने नुकसान झालं आहे. शॉर्ट सर्किटने ही आग लागली असा अंदाज आहे.
कुडाळ शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोर डॉन बॉस्को चर्चची इमारत आहे. आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमाराला फिरायला गेलेल्या पत्रकार समील जळवी यांना या इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या भागातून मोठ्या प्रमाणात धूर येताना दिसला. त्यांनी लगेच आजूबाजूच्या नागरिकांना याची कल्पना दिली. नगर पंचायत आणि एमआयडीसी अग्निशमन यंत्रणाना कल्पना देण्यात आली.
इमारतीच्या प्रवेशद्वारच्या भागात इलेक्ट्रिक मीटर आहे. त्या मीटरच्या नजीकच असलेल्या प्लॅस्टिकच्या खुर्थ्यांना लागल्याने आगीचा मोठा भडका उडाला आणि आगीने पेट घेतला. समील जळवी यांनी सर्व नागरिकांना कल्पना दिल्याने. नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
दरम्यान साधारण 7.20 वा. च्या दरम्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि कुडाळ नगर पंचायत अग्नीशामक बंब घटनास्थळी आले आणि त्यांनी आग विझवली. नागरिकांच्या आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले. या आगीमुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही, पण सुमारे दीडशे प्लास्टिक र जळून गेल्या आहेत.
आग लागल्याची खबर समजताच यावेळी घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते संजय भोगटे, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार समिल जळवी, कुडाळ तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, पप्पू नार्वेकर, श्री मळगावकर, श्री कोरगावकर तसेच कुडाळ नगरपंचायतचे कर्मचारी, निहाल फर्नांडिस आणि ईतर ख्रिश्चन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.