वेंगुर्ल्यातील हॉटेल गोलवनला आग | लाखोंचे नुकसान

Edited by: दिपेश परब
Published on: April 04, 2024 10:33 AM
views 581  views

वेंगुर्ले : उभादांडा येथील हॉटेल गोलवनला आज दुपारी सुमारे १.३० च्या वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमध्ये हॉटेल जळून खाक झाले असून सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उशिरापर्यंत ही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. 

वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा समुद्रकिनाऱ्यावर हे प्रसिद्ध गोलवन हॉटेल आहे. अचानक दुपारी आग लागल्याने सर्वांची धांदल उडाली. यावेळी कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी वेंगुर्ले नगरपरिषदेच्या अग्निशमन बंब ला पाचारण करण्यात आले. मात्र नगरपरिषदेचा बंब नादुरुस्त असल्याने लहान पाणी टँकरने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. तो पर्यंत सावंतवाडीचा अग्निशमन बंब दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. समुद्र किनाऱ्यावर हॉटेल असल्याने वाऱ्याच्या वेगाने आग वाढत होती. मात्र तोपर्यंत हॉटेल चे बरेच नुकसान झाले. हॉटेलमधील फर्निचर टेबल खुर्च्या फ्रिज जळून खाक झाले आहेत.