तुळस जैतीर मंदिर नजीक घराला भीषण आग !

लाखोंचे नुकसान
Edited by: दिपेश परब
Published on: December 28, 2023 23:08 PM
views 213  views

वेंगुर्ले: तालुक्यातील तुळस जैतिर मंदिर नजीक असलेल्या रमाकांत विष्णू पेडणेकर यांच्या घराला आज २८ डिसेंबर सायंकाळी ७.३० च्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहित उद्योजक झांटये व वेंगुर्ले नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबामार्फत आग विझवण्याची प्रक्रिया सुरू होती. घरामध्ये असलेल्या वयोवृद्ध ९० वर्षांच्या आजीला सुखरूप बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले.

  तुळस येथील जैतिर मंदिर नजिक रमाकांत उर्फ रविद्र पेडणेकर यांचे राहते घर आहे. या घरामध्ये रविंद्र पेडणेकर त्यांची बायको मेघा पेडणेकर व त्यांची आई लक्ष्मी पेडणेकर असे वास्तव्यास आहे. याच घराच्या पडवीमध्ये  पेडणेकर हे आपला तबला व पखवाज यांची दुरुस्ती व विक्रीचा व्यवसाय करतात. तर त्याच पडवीत काहीशा अंतराने सगुण नागवेकर यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे. तसेच नागवेकर हे जत्रौत्सवाला खेळणी विकण्याचाही व्यवसाय करतात. 

   आग लागताच त्या आगीने रौद्र रूप धारण केले. हा प्रकार आजूबाजूला असलेल्या ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन घराच्या मागच्या बाजूने घरातील माणसांना तसेच गॅस सिलींडर बाहेर काढले.  पेडणेकर यांच्या घरामध्ये त्यांची आई लक्ष्मी पेडणेकर ही वयोवृद्ध असून ती जाग्यावरच असते. ग्रामस्थांनी तिला सुखरूप बाहेर काढले. शॉर्टसर्कीटने आग लागल्याची चर्चा घटनास्थळी होती. या आगीत पेडणेकर यांच्याकडे दुरूस्तीला आलेली व विक्रीस असलेली तबला, पखवाज व त्यांचे साहित्य, रोख रक्कम तसेच छपरासहीत घराचे तर सगूण नागवेकर यांच्या दुकानात असलेली ज्वेलरी आणि खेळणी मिळून लाखोंचे नुकसान झाले. 

      दरम्यान आग लागल्याची माहिती मिळताच झांटये ऍग्रो इंडस्ट्रीज यांचा अग्निशमन बंब व झांटये कुटुंबीय यांनी ग्रामस्थांच्या सहाय्याने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले यानंतर वेंगुर्ला नगरपरिषदेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र यापूर्वी सर्व जळुन खाक झाले होते. घटनास्थळी तुळस गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कॉन्स्टेबल रंजिता चौहान, पोलीस प्रथमेश पालकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल परब, होमगार्ड पालयेकर यांच्यासाहित पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी सावंतवाडी तुळस मार्गे वेंगुर्ले या मुख्य मार्गावर झालेली वाहतून कोंडी सोडवली व गर्दीला बाजूला केले. 

   दरम्यान घटनास्थळी उपसरपंच सचिन नाईक, देवस्थान मानकरी अनिल परब, दिवाकर परब, रमेश परब, भगवान परब, बाळू राऊळ, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र परब, मकरंद परब, तलाठी आनंद गावडे, माजी ग्रा प सदस्य शेखर तुळसकर, सामाजिक कार्यकर्त्या सुजाता पडवळ, अजय नाईक, तुषार राय, बाबू पवार, संतोष राऊळ यांच्यासाहित ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्यासाठी नितीन लिंगोजी, वैभव होडावडेकर, भैया घोगळे, राहुल सावंत, ग्रा प कर्मचारी दीनानाथ साळगावकर, गोट्या तुळसकर, अभि चुटजी, समीर तांबोस्कर, साहिल सावंत, बाळू कबरे, संतोष कबरे, विजू परब, शानु परब, सावळाराम परब यांच्या सहित ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले 

    आग लागल्याची माहिती मिळताच झांटये ऍग्रो इंडस्ट्रीज यांचा अग्निशमन बंब यांच्या सहित उद्योजक हेमंत झांटये, सुधीर झांटये, अभिषेक झांटये, स्वप्नील झांटये, शुभम झांटये, श्रेयस झांटये, अग्निशमन वाहक चंदू मेस्त्री यांनी आग विझवण्यासाठी सहकार्य केले. उपस्थित ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले.