
सावंतवाडी : भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी पावसाने घर कोसळलेल्या निगुडेतील कार्यकर्त्याला आर्थिक मदतीसह धीर दिला. कोसळलेले घर सावरता यावे यासाठी विशाल परब यांनी दिनेश राणे यांना काही आर्थिक मदतही यावेळी केली.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेकांना नुकसानाला आणि संकटांना तोंड द्यावे लागले आहे. अशी अनेक संकटे येतील जातील, पण आपण एकदिलाने एकत्र सामोरे गेलो तर त्याची झळ जाणवणार नाही. अडचणीच्या वेळी तुमच्यासोबत राहणे हे मी माझे कर्तव्यच मानतो आणि राजकारणापलीकडे जात मी ते नेहमीच करत राहीन असे भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी म्हटले आहे.
पावसामुळे घर कोसळलेल्या निगुडेचे माजी सरपंच दिनेश राणे यांना भेट देत भाजपा कार्यकर्त्यांनी धीर दिला. त्याप्रसंगी ते बोलत होते. निगुडे ग्रामस्थांनीही यावेळी विशाल परब यांचे आभार व्यक्त केले आहेत. यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, निगुडे माजी सरपंच झेवियर फर्नांडिस, उमेश पेडणेकर, औदुंबर पालव, आशिष झाट्ये व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.