अखेर तहसील कार्यालयासमोरील ते अतिक्रमण हटविले

बांबू रोवून अडवलेली जागा केली मोकळी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 13, 2023 15:30 PM
views 1064  views

वैभववाडी: तहसील कार्यालयासमोर स्टॉल उभारण्यासाठी केलेली जागा निश्चिती अखेर आज तहसील कार्यालयाने हटवली आहे. दोन दिवसांपूर्वी काही नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर स्टॉलसाठी जागा अडवल्या होत्या. रस्त्याच्या बाजूला शासकीय जागेत अतिक्रमण केले होते. अखेर तहसील कार्यालयाने त्यावर आज कारवाई करीत बांबू रोवून अडवलेली जागा  मोकळी केली आहे.

   शहरातील स्टॉलधारकांवर कारवाई होणार होती. त्या अनुषंगाने शहरातील काही भागात स्टॉल वसवले जाणार होते, ही माहिती काही नागरिकांना मिळताच त्यांनी तहसील कार्यालयासमोर नगरपंचायतीने साफसफाई केलेल्या भागात स्टॉलसाठी जागा निश्चिती केली होती. बांबू, कापड या साह्याने स्टॉल साठी जागा अडवून ठेवली होती.

तहसीलदार कार्यालयाकडे जाणारा पूर्ण रस्ता त्याने व्यापून गेला होता. अखेर या बाबीची दखल घेत तहसीलदार कार्यालयाकडून हे सर्व अतिक्रमण आज सकाळी हटविण्यात आले आहे. सोबतच तहसील कार्यालयासमोर ठेवलेला पत्र्याचा स्टॉल देखील हटविण्यात येणार असल्याचे नायब तहसीलदार श्री. एमगेकर यांनी सांगितले.