
चिपळूण : पाग विभागातील मराठी शाळेजवळ राहणारे जगदीश गोरिवले यांच्या घरावर वारंवार झाडांच्या धोकादायक फांद्या कोसळत होत्या. गेली तीन वर्षे त्यांनी या समस्येविरोधात सातत्याने पाठपुरावा केला, मात्र त्यांना कुठेही न्याय मिळत नव्हता. अखेर सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांच्या संघर्षाला यश आले आणि त्यांच्या घराशेजारील धोकादायक झाडे हटवण्यात आली.
गोरिवले यांचे घर शाळेच्या कंपाउंडजवळ असून, त्या परिसरात पाच मोठी झाडे अनेक वर्षांपासून उभी होती. या झाडांच्या फांद्या वारंवार त्यांच्या घरावर पडत असल्यामुळे घराचे मोठे नुकसान होत होते. त्यांनी नगरपरिषद, शाळा प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना तक्रारी करूनही काहीही परिणाम होईना.
अखेर शाळेच्या कंपाउंडचे काम सुरू झाल्यानंतर, या झाडांमुळे गटार व कंपाउंडच्या कामात अडथळा येत असल्याने त्यांनी या संधीचा फायदा घेतला. त्यांनी भागातील संदेश गोरीवले यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते सुयोग चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. प्रकरणाची गंभीरता ओळखून चव्हाण यांनी दुसऱ्याच दिवशी शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्यासह पाहणी केली.
झाडांची स्थिती पाहून सकपाळ यांनी याला गंभीर धोका मानला व तत्काळ नगरपरिषद मुख्याधिकारी विशाल भोसले यांना बोलावले. मुख्याधिकारी भोसले यांनी जागेवर येऊन पाहणी केली आणि संबंधित झाडे त्वरित हटवण्याचा निर्णय घेतला. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी लगेचच ही कारवाई केली आणि गोरिवले यांच्या घराशेजारील झाडे हटवण्यात आली.
या कारवाईनंतर गोरिवले यांनी समाधान व्यक्त करत सुयोग चव्हाण, उमेश सकपाळ, संदेश गोरीवले आणि नगरपरिषद प्रशासनाचे मन:पूर्वक आभार मानले. ते म्हणाले, “जर असे जागरूक कार्यकर्ते आणि तत्पर पदाधिकारी मिळाले, तर सामान्य नागरिकांचे प्रश्न निश्चितच सुटू शकतात. हार मानू नये, हा माझा अनुभव सांगतो."