
सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील रस्स्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे अपघाताचे प्रसंग उद्भवत असून नगरपालिकेने हे खड्डे गणेश चतुर्थी सणापूर्वी तात्काळ बुजवावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार जीजी उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी केली आहे.
शहरातील बाजारपेठेतील रस्ते पहिल्याच पावसात उखडले आहेत. मे महिन्यात शहरातील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात आले होते. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने सर्वच रस्ते डांबर उखडल्याने खड्डेमय झाले आहेत. गणेश चतुर्थी सण काही दिवसांवर आला आहे. शहरात ये जा करणाऱ्या नागरिकांना या खड्ड्यांमुळे अनेक त्रासाना सामोरे जावे लागत आहे. हे खड्डे बुजवण्यासाठी त्या ठिकाणी बारीक खडी टाकण्यात आली परंतु त्या ठिकाणी स्लिप होऊन वाहनांचे अपघात होत आहेत. सावंतवाडी शहरातील नागरिकांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. शहरातील प्रभागातील रस्ते खराब झाले आहेत त्या रस्त्यावर देखील खड्डे पडले आहेत. काही प्रभागात तर ठेकेदार यांच्या निकृष्ट कामामुळे खड्ड्यांचे साम्राज्य आहे, डांबरीकरण उखडून गेले आहे. तर काही प्रभागात अर्धवट रस्ते करण्यात आले आहेत त्यामुळे ठेकेदार यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. शहरात तसेच अंतर्गत प्रभागात रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे झालेले कामे प्रशासनाने ठेकेदारांकडून वॉरंटी पिरियड मध्ये चांगल्या दर्जाचे पुन्हा करून घ्यावे. बहुतांशी शहरातील रस्त्यांची कामे काही ठिकाणी इस्टिमेट नुसार झालेली नसून ती कामे दर्जाहीन आहेत त्यांची लवकरच पुराव्यानिशी पोल खोल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.यावर तत्काळ योग्य ती भूमिका घेऊन गणेश चतुर्थी पूर्वी शहरातील रस्ते सुरळीत करण्यात यावे अन्यथा याप्रश्नी प्रशासनाला घेराव घालून जाब विचारण्यात येणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा मा आमदार उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी दिला आहे.