वेंगुर्ला खरेदी विक्री संघाच्या खत दुकानाला आग ; मोठे नुकसान

Edited by: दिपेश परब
Published on: November 19, 2023 13:11 PM
views 348  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला खरेदी विक्री संघ इमारतीच्या खाली असलेल्या खत दुकानाला आज रविवारी पहाटे ४.३० वाजता वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये दुकानातील साहित्य जळून खाक होऊन हजारोंचे नुकसान झाले आहे. दरम्यान जागरूक नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. नंतर वेंगुर्ले नगरपरिषद चा अग्निशमन बंब आल्यानंतर पूर्ण आग विजविण्यात आली. दरम्यान शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आज पहाटे ४.३० च्या दरम्याने वेंगुर्ला खरेदी विक्री संघात जिथे खत विक्री होते त्या ठिकाणी अचानक आगीने पेट घेतला. त्या दरम्यान पत्रकार प्रथमेश गुरव यांचे वडील विजय गुरव रामेश्वर मंदिरात पहाटेची काकड आरती करण्यास जात असताना त्यांना आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ शेजारी रहाणाऱ्या मोर्डेकर व समोर रहाणारे नाईक कुटुंबीयांना उठवले तसेच अग्नीशमन बंब व पोलिसांना माहिती दिली.

तोपर्यंत राहूल मोर्डेकर, ओंकार मोर्डेकर, वृंदा मोर्डेकर, विजय गुरव, निखिल घोडगे यांनी तसेच अमीत नाईक, कुणाल नाईक. प्रकाश नाईक यांनी आपल्या घरातून पाण्याचे पाईप जोडुन पाण्याची व्यवस्था करून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. राहूल मोर्डेकर याने जीवाची पर्वा न करता शटर तोडून आत प्रवेश केला आणि पाणी मारले. त्यानंतर बंब आल्यानंतर पहाटे ५.३० पर्यंत आग पूर्णतः विझवण्यात यश आले.