परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण

डॉ. युवराज मुठाळ
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 07, 2022 19:33 PM
views 221  views

सिंधुदुर्गनगरी : आंध्र प्रदेश व शेजारील प्रदेशावर वातावरणाच्या खालच्या स्तरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच आंध्रप्रदेशच्या किनारी भागापासुन तेलंगणा ते विदर्भपर्यंत द्रोणीय स्थितीमुळे काही ठिकाणी पाऊस पुन्हा सुरु झाला आहे. तथापी मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होण्यासाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे अशी माहिती ग्रामीण कृषी मौसम केंद्र मूळदेचे तांत्रिक अधिकारी डॉ. युवराज मुठाळ यांनी दिली.

     भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्रातून म्हणजेच धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून परतीचा पाऊस चार ते पाच ऑक्टोबर रोजी सुरू होणार होता. तर 10 ते 12 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या दक्षिणेतून मान्सूनचे निर्गमन होणार होते. मात्र आजतागायत उत्तर महाराष्ट्रातून मान्सून परत फिरलेला नाही. परंतु येत्या एक ते दोन दिवसात मान्सून परत फिरण्यासाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे.

     या हवामान प्रणालीमुळे दक्षिण कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात आठ ऑक्टोबर रोजी 30 ते 40 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील. तसेच विजांचा लखलखाट यासह व मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

     सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या काही ठिकाणी भात कापणी सुरू झाली आहे. अशा वातावरणामध्ये जेवढी झोडणी करता येईल तेवढेच पीक कापून घ्यावे. कापलेल्या भाताची लगेच झोडणी करून ते सुरक्षित ठिकाणी ठेवावे असा सल्ला देण्यात आला आहे.