टॅक्सी चालकावर प्राणघातक हल्ला ; एक ताब्यात, अन्य फरार

चोरट्यांचं धुमशान
Edited by: विनायक गांवस
Published on: July 10, 2025 15:10 PM
views 397  views

सावंतवाडी : कळंगुट येथील टॅक्सी चालक संजीवन वेंगुर्लेकर (वय ६५) यांच्यावर बुधवारी रात्री मालपे येथे पाच-सहा जणांच्या टोळीने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोरांनी चालकाला कळंगुट ते बांदा - सावंतवाडीपर्यंत भाडे असल्याचे सांगून टॅक्सी बुक केली. यानंतर पाच जण भाडेकरू आणि टॅक्सीचालक सावंतवाडीच्या दिशेने निघाले. दरम्यान मालपे-पेडणे येथे पोहोचताच या पाच हल्लेखोरांनी चालकावर प्राणघातक हल्ला करून त्याला लुटण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वेंगुर्लेकर यांच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पेडणे पोलिसांनी तपासचक्रे गतिमान करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा पेडणे पोलीस अधिक तपास करीत आहेत. या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली असून टॅक्सी चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काल रात्री सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने त्यातील एका चोरट्याला पकडल्याची माहिती मिळत आहे. अन्य चोरटे सापडले नसून ते दुचाकीने पसार झालेत. त्यातील एक दुचाकी कणकवली येथे रस्त्याच्या बाजूला सापडल्याचे समजते. दुचाकी चोरी प्रकरणी सावंतवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.