
कुडाळ : कुडाळ शहरात काल मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात आंदुर्ले येथील गोविंद श्रीकांत परब (वय ३०) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या डोक्याला मार लागला आहे.
अपघातानंतर त्याला तात्काळ कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पणजी-धाराशिव (उस्मानाबाद) ही एसटी बस कुडाळ एसटी बस स्थानकाकडे येत असताना नक्षत्र टॉवरजवळ भरधाव वेगाने असलेल्या दुचाकीस्वाराने बसला धडक दिली. या धडकेत दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताच्या वेळी कुडाळमध्ये जोरदार पाऊस सुरू होता, त्यामुळे रस्त्यावर निसरडेपणा होता.