भीषण अपघात ; एकुलता एक मुलगा ठार

जखमीवर उपचार
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 13, 2023 20:07 PM
views 560  views

कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावरील बिबवणे येथील सर्विस रोडवर दोन मोटर सायकलमध्ये समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात साळगाव येथील २२ वर्षीय ओंकार साऊळ या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर कौस्तुभ तेली याच्यावर गोवा बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


याबाबतची माहिती अशी,  झाराप येथील हॉटेल व्यवसायिक कौस्तुभ तेली हा आपल्या ताब्यातील डीओ स्कुटी नंबर (एमएच ०७ एसी ८४३१) ही घेऊन बिबवणे बॉक्सवेल ते झारापच्या दिशेने येत होता. त्याचवेळी झारापवरून होंडा मोटरसायकल नंबर (एमएच ०७ एन ३४२४) ही घेऊन ओंकार साऊळ हा युवक बिबवण्याच्या दिशेने येत असताना झाराप आणि बिबवणे येथे सर्व्हिस रोडची सुरुवात होते त्याच ठिकाणी दोन्ही मोटर सायकलमध्ये समोरासमोर टक्कर झाली आणि या अपघातात ओंकार साऊळ व कौस्तुभ तेली गंभीर जखमी झाले. या दोघांनाही गोवा बांबोळी येथे उपचारासाठी घेऊन जात असताना ओंकार साऊळ हा बांद्यापर्यंत गेला आणि त्या ठिकाणी त्याचे रुग्णवाहिकेतच निधन झाले. तर कौस्तुभ तेली याच्यावर गोवा बांबोळी येथे उपचार सुरू आहेत.

ओंकार साऊळ हा आई वडीलांचा एकुलता एक असून त्याने मोटर्स मेकॅनिकलचा कोर्स केला होता. सध्या पिंगुळी येथील टाटा मोटर्समध्ये तो प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होता.