
मालवण : अनधिकृत पर्ससीन मासेमारी बोटीवर कारवाई करावी तसेच इतर मागण्यांसाठी पारंपारिक मच्छिमारांनी मत्स्य विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.
पारंपारिक मच्छिमारांनी मत्स्य विभागास दिलेल्या मागणी पत्रात म्हटले आहे, सिंधुदुर्गातील पारंपारीक मच्छीमार गेली अनेक वर्षे आपल्याकडे अनधिकृतपणे मासेमारी करणाऱ्या पर्ससीन बोटीवर कारवाई करण्याची वारंवार मागणी करत आहेत. परंतु आपल्या अधिकाऱ्याकडून योग्य कारवाई होताना दिसत नाही. कारवाई करण्याचा दिखावा करून अनधिकृत पर्ससीन बोटींना मोकळीक दिली जाते. त्यामुळे पारंपारिक मच्छीमाराना मासळी मिळेनाशी झाली आहे. अधिकारी पारंपारिक मच्छीमारांना जुमानत नाहीत. पर्ससीन मासेमारी करणाऱ्या बोटीवर कारवाई करत नाही. त्यामुळे पर्ससीन बोटी किनाऱ्यालगत येऊन मासेमारी करतात. आपल्या तोंडातील घास हिसकावून घेऊन जाताना पाहून आता पारंपारीक मच्छीमार आणि पर्ससीन धारक यांच्यामध्ये समुद्रामध्ये संघर्ष सुरू झाला आहे. पारंपारीक मच्छीमारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याला सर्वस्वी जबाबदार मत्स्य व्यवसाय खाते आहे. अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळेच हे प्रसंग उद्भवतात आहेत. अनधिकृत पर्ससीन नौकांवर कारवाई करावी, मालवणचे अकार्यक्षम परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांना निलंबित करण्यात यावे, बंदरामध्ये ये जा करणाऱ्या बोटीची नोंदणी ठेवण्यासाठी सागरी सुरक्षा रक्षकांची नेमणुक करण्यात आली आहे. परंतु सुरक्षा रक्षकच अनधिकृत पर्ससीन मासेमारी करणाऱ्याशी सामिल असल्याने मालवण बंदर " सर्जेकोट बंदर ' तसेच आचरा बंदरातील सागर सुरक्षा रक्षकांना कामावरून काढून टाकण्यात यावे. बंदरावर सी सी टीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, आचरेतील जप्तीची आदेश असलेली बोट तात्काळ ताब्यात घेण्यात यावी.
दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ रोजी तळाशील येथे झालेल्या पारंपारीक मच्छीमार आणि पर्ससीन मच्छीमार यांच्यात जो वाद झाला या वादात ज्या पर्ससीन बोटी सामिल होत्या त्याच्या कागदपत्राची तपासणी करून कारवाई करण्यात यावी अशा मागण्या पारंपारिक मच्छिमारांनी केल्या आहेत.