डिगस ग्रामस्थांचं उपोषण | 'हे' ठरलं कारण

Edited by:
Published on: January 27, 2024 11:59 AM
views 105  views

कुडाळ : कॅटल हाऊस इमारत ताब्यात घेत नसल्याबाबत, लेखा संहिता ३५ टक्के खर्च मर्यादेचे उल्लंघन केल्याबाबत, विकास कामांचे सातबाराची हस्तांतरण व ग्रामपंचायत नमुना 22 मध्ये नोंद करत नसल्यामुळे डिगस ग्रामस्थांच्या वतीने डिगस ग्रामपंचायत समोर लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले. या आंदोलनात अरुण सावंत, प्रवीण पवार, बुद्धनाथ गोसावी, नित्यानंद कांदळगावकर, जयेश चिंचळकर, विलास राणे, निखिल कांदळगावकर, आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते.

याबाबत कुडाळ पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, डिगस ग्रामपंचायत व्यवस्थापनाच्या ढिसाळ मनमानी व भ्रष्ट कारभाराबाबत अनेक तक्रारी आजवर आपल्या कार्यालयाकडे करण्यात आलेल्या आहेत मात्र प्रशासनाकडून दुशना पाठीशी घालण्याचे प्रयत्न होत असून यामुळे भ्रष्ट प्रवृत्ती बोकाळला जात असून ग्रामपंचायत व्यवस्थापनाच्या मुजोरीत वाढ होताना दिसत आहे.

डिगस ग्रामपंचायत कॅटल हाऊस अजूनही ताब्यात घेत नसून त्याचा वापर अनधिकृत व अतिक्रमितपणे चालू आहे. ग्रामपंचायतला शासनाने दिलेली इमारत सुद्धा स्वतःच्या ताब्यात ठेवता येऊ नये हे डिगस गावचे दुर्दैव आहे .अशा ग्रामपंचायत व्यवस्थापनावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तातडीने कारवाई व्हावी. या बाबतचा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल पाठवण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

तर निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, लेखा संहिता 2011 नुसार 35 टक्के खर्च मर्यादेचे उल्लंघन होत असून त्याबाबत डिगस ग्रामपंचायतला 1 मे 2023 रोजी आदेशित केले होते. मात्र त्याची  अंमलबजावणी होत नसून 35 टक्के मर्यादा उल्लंघन केल्याप्रकरणी  ग्रामपंचायतवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शासन निर्णय 2019 नुसार गावातील सर्व विकासकामेही जमिनीचे हस्तांतरण व सातबारावर व नमुना 22 ला नोंद होणे आवश्यक असताना गावातील सर्व विकासकामेही कोणतीही बक्षीस पत्र व खरेदीखत न करता करण्यात आलेली आहेत त्यामुळे शासनाचा निधी खर्च झाला परंतु स्थावर मालमत्ता कोणाच्या मालकीच्याआहेत हे ठरविता येत नसून त्या स्थावर मिळकतीवरून पुढील कालावधीत वाद होण्याची शक्यता आहे. शासनाच्या निधीचा  गैरवापर केलेल्या डिगस ग्रामपंचायत व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी डिगस गावच्या ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.