
सिंधुदुर्ग : डीएड, डीटीएड नोकरीत स्थानिकांना प्राधान्य द्यावे, या मागणीसाठी जिल्हा मुख्यालय ठिकाणी गेल्या ६ दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनाला सामाजिक स्तरातून पाठिंबा व्यक्त होत आहे. सहाव्या दिवशीही बेमुदत उपोषण कायम आहे. दरम्यान, उपोषणकर्त्यापैकी ५ जणांची तब्येत खालावली असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
स्थानिकांना शिक्षक भरतीत ८० टक्के प्राधान्य द्यावे. टीईटीसारख्या परीक्षांचे ओझे कमी करावे, यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डी.एड. डी. टी.एड. उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार २७ मार्चपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
या आंदोलनाला पाचव्या दिवशी जिल्हा कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस रमेश कीर यांच्यासह जिल्हाध्यक्ष ईर्शाद शेख, साईनाथ चव्हाण, प्रकाश जैतापकर, सरचिटणीस अरविंद मोंडकर, मेघनाद धुरी, देवानंद लुडबे आदींनी उपोषणस्थळी भेट देत पाठिंबा व्यक्त केला.
चौथ्या दिवशी आमदार वैभव नाईक यांनीही भेट घेत पाठिंबा दिला होता, तर तत्पूर्वी शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी ही पाठिंबा दर्शविला. आनंद शिरवलकर यांनी पिण्याच्या पाण्यासाठी सहकार्य केलंय. तर जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनीही भेट देत पाठिंबा दिला. विविध स्तरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत असतानाच प्रशासनाकडून मात्र दखल घेतली जात नसल्याची खंत डीएड, डीटीएड संघटना अध्यक्ष विजय फाले यांनी व्यक्त केली आहे.
मागील ६ दिवसांपासून बेरोजगार महिला आपल्या चिमुरड्यांसह उपोषणाला बसल्या आहेत. यातील एका महिलेची तब्येत खालावली असून तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलंय.
दरम्यान, वय वाढत असल्याने आणि नोक भरतीची शाश्वती वाटत नसल्याने शासनाकडून ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त करत आंदोलन कायम ठेवलं आहे. शनिवारी आंदोलनाचा सहावा दिवस आहे.