
सावंतवाडी : यंदाच्या हंगामात तब्बल सात महिने पाऊस सुरू असल्याने भात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत, शासनाने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत हमी भावाने भात पीक खरेदी करण्याची योजना सुरु केली आहे. त्यानुसार, आता सावंतवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना भात खरेदीसाठी रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांनी तालुक्यातील भात पीक हमीभावाने विकू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी त्वरीत संघाच्या सावंतवाडी कार्यालयात रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन केले आहे.
खरीप हंगाम २०२५-२६ साठी भात खरेदीची नोंदणी (रजिस्ट्रेशन) सुरु झाली आहे. नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे. २०२५-२६ चा भात पिकपेरा नोंदीचा सातबारा, आधारकार्ड झेरॉक्स, चालू व्यवहार असलेल्या पासबुकची झेरॉक्स, आधार लिंक असलेला मोबाईल आणावा.
खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे आणि सचिव महेश परब यांनी संयुक्तपणे शेतकऱ्यांनी कागदपत्रांसह सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
यंदाचा हमीभाव: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे यंदाच्या हंगामात भाताला प्रति क्विंटल २३६९ रुपये इतका चांगला हमीभाव मिळणार आहे.
तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन शासनाच्या हमीभावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.












