शेतकऱ्यांनी शेतीच्या पारंपारिक पद्धतीत बदल करून प्रगती साधावी : आ. वैभव नाईक

Edited by: भरत केसरकर
Published on: July 01, 2023 21:34 PM
views 92  views

सिंधुदुर्ग : कृषी दिनाच्या निमित्ताने आज राठीवडे येथे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, कृषी विभाग, पंचायत समिती मालवण व राठीवडे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आमदार वैभवजी नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या प्रमुख उपस्थिती हा शेतकरी मेळावा संपन्न झाला. मालवण तालुक्यातील शेतकरी हे ह्या मेळाव्यात उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. 

याप्रसंगी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले कि आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी पूर्वापार चालत आलेल्या शेतीच्या पद्धतीत बदल करून शेतीत यांत्रिकीकरणाचा वापर करावा. जमिनीची मशागत, पेरणी, लावणी यामध्ये आधुनिक पद्धतीचा वापर केल्याने तसेच नवनवीन बी बियाणी यांचा वापर केल्याने शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढून शेतीच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी जिल्ह्यात येईल असे प्रतिपादन केले.  कुडाळ मालवण मतदार संघात यांत्रिकीकरणाचे १००% काम पूर्ण झालेले आहे. मागणी करेल त्या शेतकऱ्याला पावर टिलर, पावर वीडर तसेच शेतीसाठी लागणारी इतर आवश्यक यंत्रसामग्री यांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. SRI  पद्धतीच्या भात लागवडीमुळे यावर्षी भाताच्या उत्पादनात वाढ होऊन  शासनाकडून शेतकऱ्यांचे १ लाख क्विंटल भात खरेदी करण्यात आले अशी माहिती आमदार  वैभव नाईक यांनी  देऊन शेतकर्‍यांचे अभिनंदन केले. अपूर्ण असलेल्या वारस नोंदी येत्या महिनाभरामध्ये पूर्ण कराव्यात अशा सूचनाही आमदार नाईक यांनी प्रशासनाला केल्या.

याप्रसंगी कृषि विभागामार्फत शेतकर्‍यांकरिता अनेक योजना राबविल्या जात आहेत त्याचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी घ्यावा अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मा प्रजित नायर यांनी शेतकर्‍यांना दिली. कृषी विभागामार्फत अनेक योजनांची माहिती शेतकर्‍यांना यावेळी देण्यात आली.

राठीवडे येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करून मोठ्या उत्साहात कृषी दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रातीनिधीक  स्वरुपात शेतकर्‍यांना हळद रोपांचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले वृक्ष लावा दारोदारी आरोग्य येईल घरोघरी, करा वृक्षांचे संवर्धन धरतीचे होईल नंदनवन असा संदेश यावेळी देण्यात आला. प्रगतशील शेतकरी, प्रशासन अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सेवक यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

याप्रसंगी कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, राठीवडे सरपंच दिव्या धुरी, उपसरपंच स्वप्नील पुजारे, प्रकल्प संचालक आत्मा भाग्यश्री नाईक, मसदे सरपंच श्रेया परब, डॉ विद्याधर देसाई, हेमंत सावंत, डॉ प्रसाद देवधर, कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी तसेच मालवण तालुक्यातील अनेक  शेतकरी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रशासन अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.