
वेंगुर्ले : गव्यारेड्याने पाठीमागून येत अचानक केलेल्या हल्ल्यात वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर- सातवायंगणी येथील शेतकरी शशिकांत बाबुराब नाईक (५५) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उपचाराकरता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना आज सोमवारी सकाळी ८.०० वाजण्याच्या सुमारास घडली. नाईक हे सकाळी आपल्या घरा शेजारील नारळ बागेत कामासाठी गेले असता अचानक त्यांच्या पाठीमागून गव्यारेड्याने हल्ला केला. यात नाईक हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान या घटनेची माहिती वन अधिकाऱ्यांना येथील सामाजिक कार्यकर्ते देवा कांबळी यांनी फोन करून दिल्यानंतर वन अधिकारी श्री. इब्रामपूरकर् व श्री नराळे उपस्थित होत घटनेची माहिती घेतली तर नाईक यांच्या जबाब नोंदवुन त्यांना उपचारासाठी तात्काळ १० हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.
पेंडूर परिसरात गेले अनेक दिवस गव्या रेड्यानी थैमान घातले आहे. शेतीचेही मोठे नुकसान त्यांनी केले आहे. आता तर शेतकऱ्यावर हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वन विभागाने गव्यारेड्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांतुन होत आहे.