शेतकरी फळ पीक विमा योजनेपासून शेतकरी वंचित

ठाकरे सेना आक्रमक
Edited by: विनायक गावस
Published on: November 28, 2023 16:28 PM
views 85  views

सावंतवाडी : शेतकरी फळ पीक विमा योजनेची मुदत ही 30 नोव्हेंबर पर्यंतच आहे. अद्याप देखील तालुक्यातील अनेक शेतकरी हे योजनेपासून वंचित आहेत. एकही शेतकरी या योजनेपासून वंचित राहिला तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा उबाठा सेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज  भेट देऊन कृषी विभागाचे अधिकारी युवराज भुईंबर यांना दिला. 

राऊळ यांनी आज शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कृषी कार्यालयाला भेट देत माहिती घेतली. तालुक्यातील शेतकरी फळ पिक विमा योजने पासून अनेक शेतकरी हे वंचित आहेत. त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे ही रक्कम तात्काळ जमा करावी, अशी मागणी उबाठा सेनेच्या वतीने रुपेश राऊळ यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. दरम्यान येत्या 28 पर्यंत ते पैसे जमा न झाल्यास 29 रोजी भव्य मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे त्यांनी आज पुन्हा एकदा भेट घेऊन आकडेवारीची माहिती घेतली.

परंतु अद्याप देखील अनेक शेतकरी हे फळ विमा योजने पासून वंचित आहेत. तसेच काही लोकांना फॉर्म भरण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे ही तांत्रिक अडचण दूर करून संबंधित शेतकऱ्यांना पैसे मिळावेत. जर 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत दिलेल्या शेतकऱ्यांना पैसे नाही मिळाले तर आपण गप्प बसणार नाही. तसेच आपण देखील शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची मागणी करावी, असे त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

यावेळी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे,पक्ष निरीक्षक अशोक परब, गुरुनाथ राऊळ,बाळू माळकर, पुरुषोत्तम राऊळ,प्रदीप सावंत,गजा सावंत आदी उपस्थित होते.