खत विक्री व्यावसाईकांकडून शेतकऱ्यांची फसवणूक : स्वागत नाटेकर

Edited by: विनायक गावस
Published on: August 07, 2023 18:27 PM
views 517  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील तसेच इतर ठिकाणी युरिया या खताचा किरकोळ विक्रीचा दर हा शासनाने प्रमाणित केलेल्या दरापेक्षा जास्त घेतला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. सावंतवाडी तालूक्यातील अधिकृत खत विक्री केंद्रामध्ये किरकोळ खरेदी केल्यास ७ रु. प्रति किलो हा भाव आहे. तर काही ठिकाणी अधिकृत खत विक्री केंद्रामध्ये हाच खरेदी दर ८ रु. आहे.

वास्तविक पाहता केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकरी वर्गासाठी कमी किंमतीत युरिया खत उपलब्ध व्हावे या साठी केंद्र सरकार युरिया खत निर्माण करणाऱ्या उत्पादकांना अनुदान देत असल्याचे खतांच्या पिशवीवर लिहिलेले दिसून येते. सदरच्या पिशवीवर खताच्या प्रत्येक किलोची किंमत लिहिलेली आहे. खताच्या एका पिशवीचे मूळ मूल्य २६१८.७४ रु. असून यावर भारत सरकारच्या वतीने २३५२.२४ रु. एवढे अनुदान देण्यात आले आहे. यामुळे या खताच्या पिशवीचे मूल्य २६६.५०रु. एवढे आहे. तर प्रत्येक किलोचा दर ५.९२ रु. एवढा निर्धारित केलेला आहे.

असे असून सुद्धा कित्येक खत विक्री व्यावसाईक शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन शेतकऱ्यांची सरासर फसवणूक करत आहेत. या प्रकारावर आपण स्वतः लक्ष घालून शेतकऱ्यांची होणारी ही फसवणूक तात्काळ थांबविण्यासाठी कठोर कार्यवाही कारावाई अशी मागणी इन्सुली ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यांनी केलीय