नव्या शैक्षणिक धोरणांचा अवलंब करून विद्यार्थ्यांची प्रगती साधा: सदानंद रावराणे

Edited by:
Published on: March 13, 2023 10:57 AM
views 110  views

अ.रा.विद्मयालयात महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या नुतन कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार व सदिच्छा समारंभ संपन्न

वैभववाडी प्रतिनिधी :बदलत्या काळानुसार शिक्षकांनी नवे शिक्षण धोरण राबविले पाहिजे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे.येथील विद्यार्थ्यांमध्ये असलेले प्राविण्य ओळखून त्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन करा.हे विद्यार्थी संस्थेचे नाव उज्ज्वल करीत असा विश्वास महाराणा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सदानंद रावराणे यांनी व्यक्त केला.
  वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेची नुतन कार्यकारिणी काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली. या संस्थेच्या नुतन पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अधिक्षक तथा स्थानिक अध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी अर्जुन रावराणे विद्यालय, कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी येथे आयोजित केला होता.ययावेळी महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे नुतन कार्याध्यक्ष सदानंद दत्ताराम रावराणे, सचिव शैलेंद्र रावराणे, सहसचिव विजय रावराणे, सत्यवान रावराणे, खजिनदार अर्जुन रावराणे,  संचालक यशवंत रावराणे, प्रभानंद रावराणे, शरदचंद्र रावराणे, व उपस्थित मुंबई उच्च न्यायालयाचे वकील मिलिंद रावराणे यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
        या कार्यक्रम प्रसंगी नुतन कार्यकारिणी पदाधिकारी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. 'मातृसंस्थेमध्ये झालेला आजचा सत्कार हा इतर सत्कारांपेक्षा खुप विशेष असुन त्याचा मला आनंद होत आहे असे सहसचिव सत्यवान रावराणे यांनी सांगितले. तर 'सत्कार हा सत्कार्य झाल्याबद्दल किंवा सत्कार्य व्हावे यासाठी केला जातो' त्यामुळे नविन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांकडून पुढील शैक्षणिक वर्षांमध्ये नक्कीच सत्कार्य घडेल असे मत विजय रावराणे यांनी व्यक्त केले. वैभववाडी तालुका शिक्षण संस्था व महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था या दोन्ही शिक्षण संस्था एक विचाराने शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असुन संस्थेचे महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी येत्या काळात नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करून भविष्यात तालुक्यातील विद्यार्थांना पुढे आणण्यासाठी प्रयत्नशील रहावे असा मोलाचा सल्ला कार्याध्यक्ष सदानंद रावराणे यांनी उपस्थित शिक्षकांना दिला. शिवाय दोनही शिक्षण संस्थेमध्ये कार्याध्यक्ष म्हणून काम करत असताना इतर सर्व संस्था पदाधिकारी यांना सोबत घेऊन आम्ही नेहमीच तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असा विश्वास देखील त्यांनी उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाला दिला.
        या प्रसंगी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अधिक्षक तथा स्थानिक अध्यक्ष जयेंद्र रावराणे,  प्रशालेचे मुख्याध्यापक भास्कर नादकर, माध्यमिक विभाग प्रमुख संगीता पाटील, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख प्रभाकर सावंत तसेच सर्व प्रशालेचे विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार प्रभु तर आभार प्रदर्शन संदिप शिंदे यांनी केले.