जिल्हावासियांच्या प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांच दुर्लक्ष : संदेश पारकर

युवासेनेच्यावतीने वैभववाडीत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 16, 2023 18:12 PM
views 63  views

वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरकारी आरोग्य यंत्रणा विस्कळित झाली आहे. सर्वसामान्यांना उपचार घेणे सद्यस्थितीत अवघड झालं आहे. सध्याच्या महागाईत  खाजगी दवाखान्यात उपचार घेणे गोरगरीबांना परवडणारं नाही. जिल्हावासीयांच्या या प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांच लक्ष नाही. येथील जनतेला पुन्हा चांगल्या सोयी सुविधा मिळण्यासाठी सत्तेचे परिवर्तन होणे गरजेचे आहे असं मत शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी व्यक्त केले. युवासेनेच्यावतीने वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला १८९जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यामधील ७४जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे. या शिबीराच्या शुभारंभाप्रसंगी श्री.पारकर बोलत होते.

श्री.पारकर म्हणाले, एकीकडे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली असताना दुसरीकडे युवासेनेने जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सर्वसामांन्याच्या वेदना जाणून घेऊन त्या सोडविण्याच काम युवासेनेकडून केलं जातं आहे. येथील नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये म्हणून यासारखी शिबीर  राबविली जात आहेत. त्यांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला अशा शब्दांत पारकर यांनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच कौतुक केले. तर सतिश सावंत म्हणाले, शासन आरोग्य सुविधा देण्यात कमी पडल्यामुळे युवासेनेला हे काम हाती घ्यावे लागल. सर्वसामान्यांना दृष्टी देण्याचं पुण्याचं काम या संघटनेकडून होतंय हे कौतुकास्पद आहे. शासनाकडून देण्यात आलेल्या आरोग्य कार्डचा सर्वसामान्य माणसाला योग्य फायदा होत नाही. शासनाच्या या योजनेत केवळ मोठ्या आजारांवरील उपचार व शस्त्रक्रिया समाविष्ट आहेत. यात इतरही आजार समाविष्ट असणे गरजेचे आहे. तसेच या योजनेत असलेल्या जाचक अटींमुळे गरजूंना यांचा लाभ मिळवणे मुश्किल होते.याकरिता यात बदल होण गरजेच आह असं मत श्री .सावंत यांनी व्यक्त केले.

अतुल रावराणे म्हणाले, युवासेनेने ग्रामीण भागातील जनतेकरिता राबविलेल्या हा उपक्रम अत्यंत महत्वपूर्ण आहे. येथील नागरीकांना याची आवश्यकता होती. स्थानिक आमदारांनी मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे युवासेनेने राबविलेला आजचा उपक्रम सर्वसामान्यांच्या हिताचा ठरेल असा विश्वास श्री रावराणे यांनी व्यक्त केला. सुशांत नाईक यांनी आपल्या मनोगतात या उपक्रमाचा उद्देश सांगितला. या भागातील सरकारी यंत्रणा आरोग्य सेवा देण्यास कमी पडत असल्याने युवासेनेने हा उपक्रम हाती घेतला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हीच यंत्रणा घेऊन कोरोना आटोक्यात आणला होता. मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांना हे काम योग्य पद्धतीने करता येत नाही. त्यामुळे येथील जनतेच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये याकरिता युवासेनेने हा उपक्रम हाती घेतला. कणकवली मतदारसंघातील तीनही तालुक्यात नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात ज्या रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे अशांची मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे असं नाईक यांनी सांगितले. यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर विधानसभा प्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप सरवणकर ,युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्निल धुरी,  अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख- जावेद पाटणकर , रज्जब रमदुल, शहर प्रमुख - शिवाजी राणे, नगरसेवक -बंडू सावंत, युवासेना उपजिल्हाप्रमुख- अतुल सरवटे, युवासेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर ,अनिल नराम, यशवंत गवानकर, राजेश तावडे , गौस पाटणकर, सुनील कांबळे, भीमराव भोसले , राजाराम गडकर , शाबन राऊत, समीर लांजेकर ,महेश रावराणे , रवींद्र रावराणे, अनिता करकोटे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.