पोल्ट्री व्यावसायिकांची पिळवणूक थांबवणार : निलेश राणे

Edited by: भरत केसरकर
Published on: August 18, 2023 10:29 AM
views 553  views

कुडाळ : पोल्ट्री व्यवसायासंदर्भात तुमच्या असलेल्या समस्या आणि कंपनीकडून होत असलेली पिळवणूक दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी वेताळ बांबर्डे येथे सिंधुदुर्ग जिल्हा पोल्ट्री फार्मर संघटनेने आयोजित केलेल्या चर्चासत्रात सांगितले. शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ देणार नाही हा आमचा शब्द आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

   कुडाळ येथील वेताळ बांबर्डे येथे सिंधुदुर्ग जिल्हा पोल्ट्री फार्मर संघटनेच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, भाजप युवा नेते तथा उद्योजक विशाल परब, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, मोहन सावंत, पप्या तवटे, सुनील बांदेकर, योगेश घाडी, अवधूत सामंत, अमित तावडे, दिनेश शिंदे आदी उपस्थित होते.

    यावेळी पोल्ट्री फार्मर संघटनेमधील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा भाजपा नेते निलेश राणे यांच्या जवळ मांडल्या कंपनीकडून वेळेवर खरेदी केलेल्या मालाची रक्कम दिली जात नाही तसेच सध्या प्रति किलो ६ रुपयांनी कोंबडी घेतली जाते ती १० रुपये किलोने घ्यावी पिल्लांचा पुरवठा कमी प्रमाणावर होतो तसेच खाद्याचाही पुरवठा चांगला नसतो अशा समस्या मांडल्या यावेळी भाजप नेते निलेश राणे यांनी सांगितले की तुम्ही रॉयल फूड कंपनीसोबत करार केला या कंपनीला तुमच्या असलेल्या समस्या सोडवाव्या लागतील या कंपनीसोबत बोलून तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्हाला योग्य दर, खाद्य, पिल्लांचा पुरवठा करण्यासाठी कंपनीला परावृत्त करू असे भाजप नेते निलेश राणे यांनी सांगून शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही हा शब्द आम्ही देत आहोत असे सांगितले.