
सावंतवाडी : रेडी येथील श्रीदेवी माऊली विद्यामंदिर हायस्कूलच्या सन १९९९-२००० या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच उत्साहात पार पडला. या स्नेहमेळाव्यात विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या शिक्षकांनीही सहभाग घेतला होता. या कार्यक्रमादरम्यान माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी वॉटर कुलर भेट म्हणून दिला. तसेच, आपल्या गुरुजनांचा सन्मान करत त्यांना घड्याळ भेटवस्तू अर्पण केल्या.
रेडी येथील श्रीदेवी माऊली विद्यामंदिरात झालेल्या या स्नेहमेळाव्यात माजी शिक्षक आत्माराम बागलकर, अजित सावंत, मनमोहन महाले, विद्यमान मुख्याध्यापक सी. एम. जाधव, उमेश कर्णेकर यांच्यासह माजी विद्यार्थी शिवाजी सावंत, शैलेश राऊळ, मनोज शारबिद्रे, भक्ती बागवे, वर्षा साठे, सुप्रिया पेडणेकर, सागर रेडकर, मंदार बागायतकर, समिधा पाडंजी, प्रतीक्षा रेडकर आणि इतर अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी मनोज क्षारबिद्रे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिवाजी सावंत यांनी केले. या मेळाव्यात सहभागी झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शालेय जीवनातील अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. ज्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतले, तेथील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देताना आणि आपल्या शिक्षकांना भेटवस्तू देताना खूप आनंद झाल्याची भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.